आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भर पावसातच अंत्ययात्रा:नाल्याच्या पुरातून न्यावा लागला अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह

फराजखान पठाण | महागाव22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मशानभूमीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने नातेवाईकांना अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह घेवुन चक्क नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते. तालुक्यातील माळ किन्ही गावातील हा संताप जनक प्रकार असुन या ठिकाणी पुल नसल्याचा नागरिकांना सातत्याने त्रास होत आहे.महागाव तालुक्यातील माळ किन्ही येथील अविनाश कलाने वय ४० वर्षे यांचा ५ सप्टेंबर रोजी उपचारा दरम्यान शासकीय रुग्णालयात मृत्यु झाला. नातेवाईकांनी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी मृतदेह गावी आणला.

मात्र त्या दिवशी दिवसभर धुंवाधार पाऊस पडत होता. अशातच अंत्यसंस्कार करण्यासाठी असलेले दहन शेड हे नाल्याच्या पैलतीरी होते. त्याव्यतिरिक्त अंत्यसंस्कारासाठी इतरत्र जागा नसल्याने नाल्याच्या पैलतीरावर असलेल्या दहन शेड मध्ये अंत्यसंस्कार करण्याचे नातेवाइकांनी ठरविले. परंतु पाऊस सातत्याने पडत होता. त्यातच नाल्याला जोरदार पूर आला होता. त्यातच नाल्याच्या पैलतीरावर जाण्यासाठी रस्ता किंवा पुल नसल्याने व अंत्यसंस्कार करण्यासाठी विलंब होत असल्याने भर पावसातच अंत्ययात्रा काढण्यात आली.

त्यात नातेवाइकांनी मृतदेह तिरडीवर बांधुन तिरडी खांद्यावर घेवुन एकमेकांच्या सहाय्याने नाल्याच्या पुरातुन छातीपर्यंत असलेल्या पाण्यातून वाट काढीत मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. माळकिन्ही हे गाव हिंगोली लोकसभा व उमरखेड विधानसभा क्षेत्रात येत असुन खासदार हेमंत पाटील व आमदार नामदेव ससाणे हे या मतदारसंघाचे नेतृत्व करतात. त्याशिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यही आहेत मात्र या सर्व लोकप्रतिनिधींना गावकऱ्यांच्या या समस्येकडे लक्ष द्यायला वेळच नसल्याचे या घटनेवरून दिसुन येत आहे.

गावात स्मशानभूमींची व्यवस्था नाही
माळकिन्ही गावात स्मशानभूमींची व्यवस्था नसल्याने नागरिकांना वड्या नाल्याकाठी अंत्यविधी करावा लागतो आहे. आमदार, खासदार, जिल्हा परिषद सदस्य या लोकप्रतिनिधींना अनेक वेळा निवेदन दिले. मात्र त्याचा कधीही उपयोग झालेला नाही.
गजानन काळे, उपसरपंच माळकिन्ही

अंत्यसंस्कार कसा करायचा हा प्रश्न
गावाला स्मशानभूमींची व्यवस्था नाही. दहनशेड नाल्याच्या पलीकडे असल्याने पावसाळ्यामध्ये अंत्यसंस्कार कसा करायचा हा प्रश्न निर्माण होतो.
अनिल खंदारे, नागरिक

स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध नाही
माळकिन्ही येथे स्मशानभुमीसाठी जागा उपलब्ध नाही. प्रशासनाने जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामपंचायतने प्रशासनाकडे केली आहे. माळकिन्ही हे ४ हजार लोकसंख्येचे गाव असून स्मशानभूमी अभावी नागरिकांची वाताहत आहे.
शितल लहाने, सरपंच माळकिन्ही

बातम्या आणखी आहेत...