आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धक्कादायक प्रकार:जिल्हा रुग्णालयातून चक्क 27 वर्षीय युवकाचा मृतदेह गायब, कुटुंबीयांचे मृतदेहासाठी उपोषण सुरू

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बेमुदत उपोषणाला बसलेले मृत रोशनचे कुटुंबीय. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बेमुदत उपोषणाला बसलेले मृत रोशनचे कुटुंबीय.
  • साहेब रोशनचा मृतदेह शोधा, शेवटचे मुखदर्शन तरी घेऊ द्या हो...कुटुंबीयांचा टाहो

रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या एका २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह चक्क गायब झाला. हा धक्कादायक प्रकार येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात बुधवारी २१ एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आला. या घटनेला तीन दिवसांचा कालावधी लोटला, मात्र अद्यापही त्या मृतदेहाचा काहीच पत्ता न लागल्याने अखेर आस लावून बसलेल्या त्याच्या कुटुंबीयांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार देत शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता पासून मृतदेहासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात बेमुदत उपोषण सुरू केले आहे.रोशन भीमराव ढोकणे २७ वर्ष रा. पिंपळगाव काळे ता. नेर असे त्या मृत बेपत्ता तरूणाचे नाव आहे. नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील २७ वर्षीय तरूण रोशन ढोकणे याची प्रकृती अचानक बिघडल्याने कुटुंबीयांनी त्याला २० एप्रिलला नेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर नेर येथील डॉक्टरांनी रोशन याला यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात रेफर करण्याचा सल्ला दिल्याने कुटुंबीय त्याला घेवून यवतमाळला आले. दरम्यान सकाळी ७ वाजता त्याला फीव्हर ओपीडीत दाखल करण्यात आले.

सायंकाळी ५ वाजता त्याच्यावर डॉक्टरांनी उपचार सुरू केले. त्यानंतर रोशन याला पुढील उपचारांकरिता कॅज्युल्टी वॉर्ड ३३ मध्ये घेवून जाण्याचा सल्ला तेथील डॉक्टरांनी रोशनच्या कुटुंबीयांना दिला. त्यामुळे स्वत: कुटूंबीयांना त्याला कॅज्युल्टी वॉर्ड ३३ मध्ये आणले. दरम्यान रात्री ८ वाजता रोशन याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे कुटुंबीयांना डॉक्टरांकडून सांगण्यात आले. त्यानंतर कुटुंबीय रोशनचा मृतदेह बघून गावाकडे निघून आले. दुसऱ्या दिवशी २१ एप्रिलला सकाळीच त्याचे कुटुंबीय मृतदेह घेण्याकरिता यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात आले आणि ओपीडीमध्ये मृतदेह कुठे मिळणार याबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी कुटुंबीयांना शवागारात जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने कुटुंबीयांनी शवागाराजवळ येत मृतदेहाबाबत विचारपूस केली. मात्र त्या ठिकाणी मृतदेह आलाच नसल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा कुटुंबीयांनी शवागार गाठून चौकशी केली, तेव्हा देखील मृतदेह आला नसल्याचेच उत्तर मिळाले. त्यानंतर मात्र कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दिल्याने खळबळ उडाली आहे.

अातापर्यंत ४ रुग्ण बेपत्ता
जिल्हा रुग्णालयात फक्त कोरोनाचे शेकडो रुग्ण उपचार घेत आहे. या रुग्णांपैकी आतापर्यंत ४ रुग्ण बेपत्ता झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यापैकी २ प्रकरणात रुग्णालय प्रशासनाकडून पोलिस ठाण्यात रुग्ण बेपत्ता झाल्याच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. रुग्णांना एका वॉर्डातून दुसरीकडे हलवल्यानंतर नातेवाईकांना बऱ्याचदा त्याचा शोध घ्यावा लागतो अशी रुग्णालयाची सध्या परिस्थिती आहे.

मृतदेह एक्सचेंज तर झाला नाही ना?
यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. दि. २० एप्रिलला जवळपास जिल्ह्यातील २९ जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या दिवशी दि. २१ एप्रिलला जिल्हा शासकीय रुग्णालयातून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी घेवून जात असलेल्या मृत देहात चुकून रोशन ढोकणे या २७ वर्षीय तरुणाचा मृतदेह तर एक्सचेंज झाला नाही ना?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

पळून गेलेल्या रुग्णाचा झाला होता मृत्यू
काही दिवसांपूर्वी शहरातील लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह आढळला होता. तो पोलिसांनी वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. त्यावेळी तो जिल्हा रुग्णालयातून पसार असलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृतदेह असल्याचे उघडकीस आले होते. त्यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब उघड झाल्यावर मोठा गोंधळ उडाला होता.

मृत्युसंख्या वाढल्याने उडतोय गोंधळ
जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांपैकी अनेक रुग्णांचा दरदिवशी मृत्यु होत आहे. मृत्युची संख्या वाढली असल्याने रुग्णालयातील शवागारात ठेवण्यात येणारे मृतदेह मोठ्या संख्येने असतात. त्यातही अंत्यसंस्कार करणारी यंत्रणा तीच असल्याने अंत्यसंस्कारापर्यंत मृतदेह शवागारात असतात. मोठ्या संख्येने मृतदेह एकाच ठिकाणी ठेवण्यात येत असल्याने बराच गोंधळ निर्माण होत आहे.

या घटनेची चौकशी सुरू केली आहे
जिल्हा रुग्णालयात दरदिवशी मोठ्या संख्येने मृत्यु होत आहेत. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक मृतदेह ठेवण्यात येतात. त्यात संबंधित तरुणाचा मृतदेह कुणा दुसऱ्या नातेवाइकांना देण्यात आला की, त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले या सर्व बाबी तपासण्यात येत आहे. या घटनेसंदर्भात चौकशी सुरू करण्यात आली आहे. डॉ. मिलिंद कांबळे, वैद्यकीय अधिष्ठाता,व.ना.शा.वै.महाविद्यालय,यवतमाळ

५० वर्षीय रुग्णही दहा दिवसांपासून बेपत्ता
यवतमाळ तालुक्यातील बोथबोडन येथील ५० वर्षीय व्यक्तीची प्रकृती ठिक नसल्याने कुटुंबीयांना त्यांना यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. यावेळी प्रथम त्या रुग्णाची डॉक्टरांनी कोरोना चाचणी केली, यात त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना डॉक्टरांनी दि. ६ एप्रिलला रुग्णालयातील वॉर्ड २५ मध्ये पुढील उपचारार्थ दाखल केले. दरम्यान दि. १४ एप्रिलला त्या रुग्णाचा मुलगा वडिलाला भेटण्यासाठी रुग्णालयातील वॉर्ड २५ मध्ये गेला. मात्र, त्या ठिकाणी त्याला वडील आढळून आले नाही, दरम्यान रुग्णालय प्रशासनाला विचारपूस करीत सर्वत्र शोधमोहीम राबवण्यात आली. परंतू ते कुठेच आढळून आले नाही. अखेर चार दिवस शोधमोहीम राबवल्यानंतर दि. १८ एप्रिलला मुलाने थेट अवधुतवाडी पोलिस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिली. आता या घटनेला दहा दिवस लोटत असून अद्यापही त्यांचा शोध लागलेला नाही.

बातम्या आणखी आहेत...