आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादोन दिवसांपूर्वी विठ्ठल जाधव या २५ वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती. ही घटना दिग्रस तालुक्यातील साखरा येथे उघडकीस आली. त्यानंतर या हत्या प्रकरणी संशयित दोन दिवसापासून बेपत्ता होता. अशात गुरूवार, दि. ४ ऑगस्टला सकाळच्या सुमारास गावातील एका विहिरीवर त्याचा मृतदेह तरंगताना आढळून आला. दिलीप हिरा सिंग जाधव वय ४० वर्ष रा. साखरा असे विहिरीत आढळलेल्या मृत युवकाचे आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, दिग्रस तालुक्यातील साखरा येथे दि.१ ऑगस्टला मध्यरात्री विठ्ठल जाधव या तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. या हत्ये मागचे कारण काय, यासाठी पोलिस यंत्रणा तपास कार्य फिरवत असतांना संशयित दिलीप जाधव याची चप्पल साखरा शिवारात असलेल्या एका विहिरीजवळ आढळून आली होती. त्यामुळे पोलिसांनी विहिरीजवळ श्वान पथकाच्या सहाय्याने दोन वेळा शोध घेतला. परंतु श्वान पथक जागीच गिरक्या मारत होते. त्यानंतर पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने विहिरीत पाहणी केली.
मात्र काहीच आढळून आले नाही. अशात गुरूवार, दि. ४ ऑगस्टला सकाळी दिलीप जाधव याचा मृतदेह विहिरीत तरंगताना नागरिकांना आढळून आला. घटनेची माहिती मिळताच दिग्रस पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धाव घेवून पाहणी केली. बराच काळ मृतदेह पाण्यात असल्याने मृतदेहाची दुर्गंधी सुटली होती. दरम्यान घटना स्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी करीता रुग्णालयात दाखल करण्यात आला. मृत दिलीप जाधव यांच्या पश्चात आई, वडील, १ मुलगा, १ मुलगी असा परिवार आहे. या प्रकरणाचा तपास दारव्हा उपविभागीय अधिकारी आदित्य मिरखेलकर, ठाणेदार धर्मा सोनुने यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक उपनिरीक्षक राजेश लाखकर, रवींद्र जगताप, ब्रम्हानंद टाले करित आहे. दिलीपचा मृतदेह विहिरीत कसा आला, त्याने आत्महत्या केली की, घातपात झाला, अश्या विविध चर्चेला गावात उधाण आले आहे.
विठ्ठल जाधव हा दिलीप जाधव याचा चुलत भाऊ असून विठ्ठल याने दिलीप याची पत्नी पळवून नेली होती. त्यानंतर दिलीप याने त्याच्या पत्नीला सोडचिठ्ठी दिली होती. यावरून विठ्ठल जाधव याच्या हत्या प्रकरणात दिलीप जाधव हा संशयित असल्याचे बोलल्या जात होते. अशातच पोलिसांचा तपास सुरू असतांना गुरुवारी सकाळी दिलीप जाधव याचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.