आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक चुका:खर्डा प्रकल्पाचा खर्च पोहचला साडेचारशे कोटींवर

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बाभुळगाव तालुक्यातील खर्डा लघु पाटबंधारे प्रकल्पाचे काम मूळ प्रकल्प अहवालानुसार त्वरित पूर्ण करून सरुळ गावाचे पुनर्वसन करावे, असे निर्देश तत्कालीन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले होते. मात्र, तांत्रिक चुकांमुळे प्रत्यक्षात कामाला सुरुवातच होऊ शकली नाही. अशात प्रकल्पाच्या कामाच्या दृष्टीने सोमवारी नाशिक येथे तांत्रिक सल्लागार समितीची बैठक पार पडली. यात प्रकल्पाचा खर्च साडेचारशे कोटींवर पोहोचल्याची चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

बाभूळगाव तालुक्यातील खर्डा सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील सात गावातील एक हजार १७५ हेक्टर सिंचनाचा लाभ मिळणार होता. दरम्यान, २९ कोटी १६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता डिसेंबर २००६ मध्ये तत्कालीन सरकारने दिली होती. मात्र, भु-संपादनात निर्माण झालेल्या चुकांमुळे सरूळ गावाच्या पुनर्वसनाचा प्रश्न रखडला होता. तद्नंतर साठवण तलावात रूपांतर करण्याचा निर्णय झाला होता. त्या अनुषंगाने प्रत्यक्षात कामाला सुरूवात सुद्धा झाली होती. मात्र, लोकप्रतिनिधींनी नकार घंटा दर्शवल्याने जैसे थे स्थितीतच काम थांबविण्यात आले होते. दरम्यान, तत्कालीन जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्र्यांनी लघु प्रकल्पाचे काम आणि सरूळ गावाचे पुनर्वसन करण्याच्या दृष्टीने परत प्रस्ताव सादर करावा, असे आदेश दिले होते. या समितीची नाशिक येथे सोमवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी बैठक पार पडली.

बातम्या आणखी आहेत...