आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबुटीबोरी-तुळजापूर या जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वर आर्णी तालुक्यात कोसदनीचा घाट आहे. या घाटात रस्ता तयार करतेवेळी महामार्गालगत तयार झालेली दरड पावसाळ्यात कोसळत आहे. अत्यंत धोकादायक झालेली ही दरड या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसाठी मृत्युचा सापळा ठरु पाहत असल्याचे दिसते.
बुटीबोरी ते तुळजापूर असा महामार्ग भारतीय सडक प्राधीकरण (एनएएचआय) यांच्या माध्यमातुन तयार करण्यात येत आहे. बुटीबोरी पासुन सुरू झालेल्या या महामार्गाचे काम यवतमाळ जिल्ह्यातील महागाव पर्यंत पूर्णही झाले आहे. त्यापुढील काम अद्याप सुरू आहे. पुर्ण झालेल्या या महामार्गाच्या कामा दरम्यान यवतमाळ पासुन माहुरकडे जाणाऱ्या मार्गावर कोसदनीचा घाट आहे. या घाटामध्ये वळणाचा रस्ता सरळ करण्यासाठी पुर्वीच्या मुळ रस्त्याच्या ऐवजी नवा रस्ता तयार करण्यात आला आहे. मोठा डोंगर पोखरुन घाटात हा रस्ता तयार करण्यात आला आहे. फोर-वे लेवल नुसार घाट उभा कट करण्यात आल्याने, या ठिकाणी महामार्गाच्या दोन्ही बाजुचे काठ खूप उंच म्हणजे सुमारे ४० फूट पर्यंत तयार झाले आहेत.
रस्त्यासाठी आवश्यक असलेल्या ठिकाणीच डोंगर पोखरण्यात आल्याने रस्त्याच्या कडेला असलेला डोंगर सरळ ४० फुट उंच उभा ठाकला आहे. त्याला कुठलाही आधार नसल्याने पावसाळ्यात या डोंगरावरील दगड, मुरूम आणि माती सैल होवुन ती थेट महामार्गावर येवुन पडते. त्यामुळे या मार्गाने मार्गक्रमण करणाऱ्या वाहनधारकांसाठी महामार्गावरील कोसदनी घाटात असलेली ही दरड मृत्युचा सापळा ठरु पाहत असल्याचे दिसते.
महामार्गावर कोसदनी घाटात अशा प्रकारच्या दरड कोसळण्याच्या घटना पावसाळ्यात सातत्याने घडतात. गेल्यावर्षी पावसाळ्यात एका चारचाकी वाहनावरच दरड कोसळली होती. मात्र त्या अपघातात सुदैवाने जीवितहानी टळली होती. यंदाही जुलै महिन्यात झालेल्या पावसानंतर दरड ढासळल्यास सुरूवात झाली. मात्र ही बाब लक्षात येताच महामार्ग पोलिसांनी तातडीने उपाययोजना सुरू केली. यासंदर्भात संबंधीत विभागांना आणि महसुल प्रशासनाला माहिती असतानाही या गंभीर बाबीवर तातडीने उपाययोजना करण्यात येत नसल्याने या ठिकाणी गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. महामार्गावरील दरड असलेल्या ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात याव्या अशी मागणी प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकडुन करण्यात येत आहे.
एका बाजूची वाहतूक बंद
जिल्ह्यात जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला आहे. या पावसामुळे कोसदनी घाटात रस्त्याच्या एका बाजूची दरड कोसळून रस्त्यावर आली. याची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूची वाहतुक बंद केली होती. रस्त्यावर पडलेला मलबा तयास असुन दरड कोसळण्याची शक्यता अद्याप कायम आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून एका बाजूची वाहतुक या ठिकाणी बंदच आहे.
पाहणी झाली, मात्र कारवाईचा पत्ता नाही
कोसदनी घाटात दरड कोसळताच त्याची माहिती संबंधीत सर्व विभागांना देण्यात आली होती. त्यावरुन महसुल, भारतीय सडक प्राधिकरण या विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन पाहणी केली. इतकेच नव्हे तर संबंधीत कंत्राटदार कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. मात्र त्यानंतर अद्यापही यासंदर्भात कुठलीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
काठावरील झाडे कोसळण्याची भीती
रस्त्यासाठी पोखरलेल्या डोंगराच्या उंचच्या उंच कडा रस्त्याच्या दोन्ही बाजुला आहे. या कडांच्या काठावर मोठमोठी झाडे आहेत. डोंगर पोखरतेवेळी त्या झाडांची मुळे उघडी पडली आहेत. त्या झाडांना मातीचा आधार फार कमी राहीला आहे. त्यामुळे वादळ वाऱ्यामुळे ही झाडे त्या उंचीवरून खाली रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर पडुन अपघात होण्याची शक्यता कायम असते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.