आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:लोकप्रतिनिधीने दत्तक घेतलेल्या माळ आसोली गावाची दयनीय अवस्था; स्मशानभूमीचा प्रश्न सहा वर्षांपासून प्रलंबित, नागरिकांची हेळसांड

पुसद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुसद तालुक्यातील माळ आसोली येथील जुन्या वहिवाटीचा शासकीय नकाशावरील पाणंद रस्ता अडवला आहे. यामुळे पावसाळ्यात पडणारे पाणी शेतात जात असल्याने पिकाचे मोठे नुकसान होते. शेत शिवारात इतरही शेतकऱ्यांची शेती असून याच पाणंद रस्त्याने शेतकऱ्याला ये-जा करावी लागते. मात्र तो पाणंद रस्ताच बंद केल्यामुळे शिवारातील शेतकऱ्यांना ये जा करताना कसरत करावी लागते. गावात राहणाऱ्यानेच पाणंद रस्ता आडवल्याने परिसरातील शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोबतच गावातून स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता सुद्धा आडवल्याने हा रस्ता मोकळा करण्यासाठी मागील ६ वर्षांपासून ग्रामस्थांना शासकीय व प्रशासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. लोकप्रतिनिधीने दत्तक घेतलेल्या गावाची दयनीय अवस्था झाली असून, जिल्हाधिकाऱ्यांसह एसडीओ, तहसीलदारांकडे वारंवार तक्रार करून देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही. त्यामुळे राज्य सरकारनेच तालुक्यातील गावाकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी जोर धरत आहे.

पुसद तालुक्यातील माळ आसोली गाव शासनाच्या संकेत स्थळावर ८६२ मतदाते असलेले गाव आहे. निवडणुकीच्या तोंडावर उमेदवार गावचा विकास करू, असे आश्वासन देऊन जातात. गावचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी गाव दत्तक घेतले आहे. मात्र सहा वर्षांपासून गावचा विकास खुंटलेला आहे. गावातील शेतकरी उत्तम जाधव, लहू जाधव, चंदन जाधव, अंकुश जाधव, लिलाबाई जाधव यांनी नकाशावरील जुन्या वहिवाटीचा पाणंद रस्ता कायमचा बंद केला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून स. नं. ४८, शोभा विठ्ठल राठोड यांच्या पूर्वेकडील क्षेत्रफळ १ हेक्टर शेतीचे नुकसान होत आहे. पाणंद रस्ताच बंद केल्यामुळे पावसाचे पाणी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून पिकांचे नुकसान होत आहे. शेतात जाणारा पाणंद रस्ता मोकळा करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना गावकऱ्यांनी ८ मार्च २०१७ रोजी तक्रारवजा निवेदन सुद्धा दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी पुसदच्या तहसीलदाराला १४ मार्च २०१७ रोजी आदेश काढून अहवाल सादर करण्याचे पत्र सुद्धा दिले होते. मात्र त्या आदेशावर आजवर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली दिसून आली नाही.

जि. प. बांधकाम विभागाकडे तीन पाणंद रस्त्यांची मागणी
माळ आसोली परिसरात शेत शिवारात जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे तीन पाणंद रस्त्याची मागणी केली आहे. तसा प्रस्ताव देखील जिल्हा परिषद बांधकाम विभागात ग्रामपंचायत स्तरावरून सादर केला आहे. ग्रामस्थांनी आमच्याकडे तक्रार न करता थेट जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे. तक्रार केली असती तर आम्ही विचार केला असता.
- बंडू गुळवे, ग्रामसेवक, माळ आसोली.

नायब तहसीलदारांनी ६ वर्षांपूर्वी हजर राहण्याचे दिले होते आदेश
माळ आसोली गावात राहणारे उत्तम जाधव, लहू जाधव, चंदन जाधव, अंकुश जाधव, लिलाबाई जाधव यांना १९ ऑगस्ट २०१६ रोजी सकाळी ११ वाजता पुसद तहसील कार्यालयात हजर राहण्याचे आदेश तत्कालीन नायब तहसीलदार देवानंद धबाले यांनी दिले होते. त्या आदेशावरही अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर न केल्याचा गंभीर आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर केले अतिक्रमण
स्मशानभूमीजवळ अतिक्रमण केल्यामुळे रस्ता बंद झाला असून कारवाई करण्याची मागणी गावकऱ्यांनी पुसदच्या उपविभागीय अधिकारी यांच्याकडे ५ जानेवारीला केली होती. आमदाराने दत्तक घेतलेल्या गावाकडे आमदाराचे दुर्लक्ष होत असल्यामुळे गावकऱ्यांनी आता कुणाकडे जावे असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर विठ्ठल राठोड, बाबुराव चव्हाण, उत्तम साखरे, भारत राठोड, सचिन जाधव, अनिल चव्हाण, इंदल चव्हाण, कैलास राठोड, रामप्रसाद राठोड, संतोष चव्हाण, लक्ष्मण धुळधुळे, मोहन चव्हाण, अतुल राठोड आदींच्या सह्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...