आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामिनी मंत्रालय म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसह जिल्ह्यातील सर्व १६ नगर पंचायतीच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून रखडल्या होत्या. मात्र आता न्यायालयाच्या निर्णयामुळे या निवडणुका घेण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे. त्यातच येणाऱ्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आता वर्तवण्यात येत आहे.
जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व १६ पंचायत समितीचा कार्यकाळ २० मार्चला संपला आहे. मात्र कार्यकाळ संपल्यानंतरही ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे त्यांच्या निवडणुका रखडुन पडल्या होत्या. तेव्हापासुन या सर्व ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच आदेश देत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचे निर्देश राज्याच्या निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. सोबतच दोन आठवड्यात निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचेही आदेश दिले आहेत. त्यामुळे आता रखडलेल्या सर्व निवडणुका घेण्यासंदर्भात शासनस्तरावर हालचाली सुरू झाल्या असुन त्यांना वेग आला आहे. त्यातच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुकीसंदर्भात गट आणि गणांच्या प्रारूप प्रभाग रचनेसंदर्भात कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या कार्यक्रमात विभागीय आयुक्त येत्या जुन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे झाल्यास जुन महिन्याच्या आक्षेप, हरकती नोंदवीन त्यावर सुनावणी होवुन जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अंतीम प्रभाग रचना जाहीर होण्याची शक्यता आहे.
यानुसार कार्यक्रम जाहीर झाल्यास जुलै महिन्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागुन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेता शासन स्तरावरच नव्हे तर स्थानिक प्रशासन स्तरावरही धावपळ सुरू झाली आहे. निवडणुकीसंदर्भात कारवाईसाठी अधिकारी, पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. तर दुसरीकडे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका होणार यावर आता शिक्कामोर्तब झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यात उमेदवार निश्चितीपासुन कोण उमेदवार कुठल्या गटामधुन निवडणुक लढवणार यासाठी जिल्हा परिषदेत चुरस होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.