आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतपेटीत बंद:जिल्ह्यातील एक हजार 702 उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीमधील ९३ सरपंच आणि ६४९ सदस्य पदांसाठी रविवार दि. १८ डिसेंबर रोजी मतदान पार पडले. निवडणूक रिंगणातील एक हजार ७०२ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. मतदार राजा नेमका कुणाला विजयाचा कौल देणार हे मंगळवार, दि. २० डिसेंबर मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होईल. जिल्ह्यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६८.३१ टक्के मतदान झाले होते. अनुचीत प्रकार घडू नये यासाठी कडक पोलिस बंदोबस्त होता.

नोव्हेंबर ते डिसेंबर पर्यंत मुदत संपलेल्या शंभर ग्रामपंचायतीच्या शंभर सरपंच आणि ७७६ सदस्य निवडीकरिता रविवार, १८ डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सकाळी ७.३० पासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळच्या सुमारास मतदानाला अल्प प्रतिसाद होता. तर मतदानाच्या टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक रिंगणातील उमेदवारांसह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना बाहेर काढण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. यंदा सरपंचाची निवड मतदारांमधून होणार असल्यामुळे निवडणुकीला चांगलाच रंगत आली होती. सरपंच पदाच्या उमेदवारांनी निवडून येण्यासाठी कंबर कसली होती.

विविध आश्वासने देऊन मतदारांना आकृष्ट करण्याचा प्रयत्न केला. सकाळी ९.३० वाजतापर्यंत जवळपास ९ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर दुपारी तीन वाजेपर्यंत ६८.३१ टक्क्यापर्यंत मतदानाची आकडेवारी पोहोचली होती. यात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ३५ हजार ७३ महिला, तर ३४ हजार ९४६ पुरूष, असे मिळून ७० हजार १९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत साधारणत: ८२ टक्क्यापर्यंत मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

दरम्यान, रविवारी जिल्ह्यातील १ हजार ७०२ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले असून, सोमवार, १९ डिसेंबर रोजी सकाळपासून तहसील स्तरावर मतमोजणीला सुरूवात होणार आहे. मतदारांनी नेमकी कुणाच्या गळ्यात विजयाची माळ टाकली हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. दुपारी साडेतीन वाजतानंतरही मतदान केंद्रावर मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत होती. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला होता. काही संवेदनशील केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त सुद्धा होता. तर जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकाऱ्यांसह तहसीलदारांनी सुद्धा विविध मतदान केंद्रावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साह
निवडणुकीत पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांचा आकडा मोठ्या संख्येने आहे. अशा मतदारांनी स्वत:हून मतदान केंद्रावर जाऊन आपल्या आवडीच्या उमेदवाराला मतदान केले. यावरून पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे पहावयास मिळाले. त्याचप्रमाणे अनेक वयोवृद्धांनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला.

बोथबोडण येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट
यवतमाळ तालुक्यातील बोथबोडण ग्रामपंचायतीत मतदान प्रक्रिया सुरू झाल्यानंतर विविध प्रकारच्या वावड्या उठल्या होत्या. दरम्यान, स्वत: जिल्हाधिकारी अमोल येडगे, तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी प्रत्यक्ष बोथबोडण गावात भेट दिली. यावेळी मतदारांशी सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी संवाद साधला. एकंदरीत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली.

निवडणुकीच्या बहिष्कारावर शिंदोला येथील ग्रामस्थ ठाम
वणी तालुक्यातील शिंदोला ग्रा.पं. तील ग्रामस्थांनी सार्वजनिक निवडणुकीवर बहिष्कार टाकला. तो मागे घेण्यासाठी उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. शरद जावळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी आवाहन केले होते. मात्र, याचा उपयोग झाला नाही. शेवटी रविवारी मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारचे साहित्य पोहोचले नाही.

बातम्या आणखी आहेत...