आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्वाही:ग्राहकाला शोषणातून मुक्त करणे हेच अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे लक्ष्य; अजय भोसरेकर यांचे प्रतिपादन,बिंदुमाधव जोशी स्मृती दिन साजरा

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्राहकांना न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत कटिबद्ध असून ग्राहकांनाही आपल्या शोषणाविरुद्ध संघर्ष करता यावा यासाठी त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यासाठी सुद्धा विविध प्रकारच्या माध्यामातून प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन ग्राहक पंचायतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय भोसरेकर यांनी येथे केले.ग्राहक पंचायतीचे संस्थापक बिंदुमाधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त यवतमाळ जिल्हा ग्राहक पंचायत तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. ग्राहक पंचायतीचे विदर्भ प्रांत अध्यक्ष डॉ.नारायण मेहरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्हा संघटन मंत्री हितेश सेठ, सचिव डॉ. केशव चेटुले यावेळी मंचावर उपस्थित होते.

अत्यंत अभ्यासपूर्ण भाषणातून त्यांनी बिंदुमाधव जोशी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. अथक प्रयत्न करून तयार करण्यात आलेला ग्राहक संरक्षण कायदा संसदेत कोणत्याही प्रकारचा विरोध न होता पारित करण्यात आला. २०१९ चा सुधारित कायदा सुद्धा ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायक असून त्याचा सर्वांनी अभ्यास करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य ग्राहकांना सुद्धा हा कायदा समजावून सांगून त्याची योग्य अमलबजावणी होण्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.

त्यासाठी ग्रामीण भागात अभ्यासवर्ग आयोजित करण्यात आले तर त्याचा जनतेला अधिक लाभ होईल असेही त्यांनी सांगितले. डॉ. नारायण मेहरे यांनी आपल्या भाषणात ग्राहक चळवळीतील कार्यकर्त्यांनी ग्रामीण परिसरात शेतकरी ग्राहक प्रबोधन मेळावे आयोजित करण्याचे आवाहन केले. प्रारंभी स्वामी विवेकानंद व बिंदुमाधव जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येवून दीप प्रज्वलन करण्यात आले. संजय जोशी यांनी ग्राहक गीत सादर केले. याच कार्यक्रमात डॉ. मेहरे यांचा प्रांताध्यक्ष म्हणुन निवड झाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच ग्राहक चळवळीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पुणे येथील अजय भोसरेकर यांचा शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.सुखकर्ता हॉटेल च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हयातील विविध तालुक्यातील ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते,शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र कठाळे तर प्रस्तावना ॲड. राजेश पोहरे यांनी तर डॉ. शेखर बंड यांनी आभार मानले. याप्रसंगी प्रकाश चनेवार, मोहन कुलकर्णी, जितेंद्र बंगाले, प्रमोद बाजोरिया, प्रा. मतीन खान, ॲड. विलास देवसरकर, डॉ. कैलाशचंद्र वर्मा, राधाकृष्ण जाधवानी, ॲड. किशोर देवानी, अंबादास घामोरे, विवेक अंगाईतकर, शरद ढोबळे, शरद मन्नरवार, केशव मोरे इत्यादींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...