आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रदूषणात मोठी वाढ:दोन्ही मालधक्क्यांवरुन सतत उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात; परिसरातील जनता अधिकाऱ्यांविरोधात घेराव आंदोलनाच्या पवित्र्यात

वणी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वणी ते वरोरा मार्गावर असलेले दोन्ही कोळशाचे माल धक्के प्रदूषण वाढीला कारणीभूत ठरू लागले आहे. अगदीच लोक वस्तीलगत असलेले हे कोळशाचे माल धक्के काळी धूळ ओकू लागल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कोळशाच्या मालधक्क्यांमधून उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील नागरिक विविध आजारांनी ग्रस्त झाले आहे. या दोन्ही कोळशाच्या मालधक्यांवर योग्यरीत्या पाण्याचा निचरा होत नसल्याने वावटळ सुटल्या गत कोळशाची धूळ उडून नागरिकांच्या घरात शिरते. सतत उडणाऱ्या या काळ्या धुळीमुळे घरा दारातील वस्तूंबरोबरच अख्खं घर व परिसर काळाशार होतांना दिसतो. या कोळशाच्या मालधक्क्यांमधून उडणाऱ्या काळ्या धुळीमुळे येथील नागरिक वैतागवाणे झाले आहेत. अनेक वर्षांपासून काळ्या धुळीचा सामना करणाऱ्या नागरिकांचा आता संयम सुटू लागला आहे. ते कोळशाच्या मालधक्यांवर धडकण्याच्या तयारीत आहे.

कोळसा मालधक्क्यांवरील अधिकाऱ्यांना घेराव घालून तीव्र आंदोलन छेडण्याच्या पवित्र्यात येथील नागरिक असल्याचे परिसरातील चर्चे मधून ऐकायला मिळत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सर्व नियम या कोळसा साईडींग वरील अधिकाऱ्यांनी धाब्यावर बसविले आहेत. वेकोलिच्या कोळसा साईडींग व्यवस्थापनाने तर प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषणाचे नमुनेच पाठवणे बंद केल्याची माहिती आहे.

या धुळीच्या प्रदूषणाने उच्चांक गाठला असतानाही प्रदूषण नियंत्रण विभाग निद्रावस्थेत आहे, याचेच नवल वाटते. मालधक्यांवर मुबलक पाणी न मारता केवळ पाण्याच्या टँकरचे वाढीव बिल काढल्या जात असल्याची खुली चर्चा या ठिकाणी ऐकायला मिळते. काही वर्षांपूर्वी वेकोलिच्या कोळसा सायडिंगवर पाण्याचा निचरा करण्याकरिता ठिकठिकाणी स्प्रिंकलर लावण्यात आले होते. पण आता कुठे गेले हेच कळायला मार्ग नाही. नागरिकांच्या आरोग्याशी व एकंदरीत त्यांच्या जीविताशी येथील अधिकाऱ्यांनी खेळ चालविला असल्याची तीव्र प्रतिक्रिया येथील नागरिकांमधून ऐकायला मिळत आहे. कोळसा मालधक्क्यांवरील अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणाचा कळस गाठला असून धुळीच्या प्रदूषणाबाबत ते उदासीनता दर्शवितांना दिसत आहे. त्यामुळे प्रदूषणाचा सामना करणाऱ्या नागरिकांनी आता त्यांना जबाबदारीची जाणीव करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षांपासून कोळशाच्या धुळीचा सामना करणाऱ्या नागरिकांनी आता धुळीच्या समस्येला घेऊन दोन्ही कोळसा मालधक्यांवर आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला आहे.

लोकवस्ती लगत असलेल्या दोन्ही कोळशाच्या मालधक्क्यांमधून उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे. धुळीच्या समस्येमुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांनी आपली घरे विक्रीस काढली आहेत. या कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे येथील नागरिक हा परिसर सोडून जाणे पसंद करू लागले आहे. विषारी अशी ही धूळ येथील रहिवाशांच्या जीवनातच विष घोळू लागली आहे. अनेकांना विविध प्रकारचे त्वचा रोग झाले आहे. शरीराला खाज सुटली आहे. फुप्फुसांच्या व श्वसनाच्या आजाराने नागरिक ग्रस्त झाले आहे. विविध प्रकारच्या आजारांचा सामना करणाऱ्या नागरिकांचा आरोग्यावरील खर्च वाढला आहे.

बातम्या आणखी आहेत...