आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्गाचा उद्रेक:जिल्ह्याची आरोग्य अंत्यत भयावह; 39 जणांचा मृत्यू; जिल्ह्यात 1 हजार 105 जण आढळले पॉझिटिव्ह

यवतमाळ12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हा रुग्णालयात 490 तर खासगीत 542 रुग्ण ऑक्सिजनवर

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहे. त्यातही अत्यवस्थ रुग्ण मोठ्या संख्येने आहेत. जिल्ह्यात सध्या ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांपैकी तब्बल १०९४ रुग्ण ऑक्सीजनवर आहे. त्यांच्यासाठी दरदिवशी जिल्ह्यात १९ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. सध्या हे ऑक्सिजन कसेबसे उपलब्ध होत आहे. मात्र रुग्णसंख्या अशाच पद्धतीने वाढत राहिल्यास या महिन्याच्या अखेर जिल्ह्यात ऑक्सिजनची टंचाई निर्माण होईल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

जानेवारी २०२१ पासून जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्यास सुरूवात झाली. अवघ्या काही महिन्यातच ही संख्या प्रचंड वाढली. त्यातही कोरोनाच्या पहील्या लाटेपेक्षा या दुसऱ्या लाटेत कमी दिवसात रुग्ण अधीक अत्यवस्थ होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्या रुग्णांपैकी बरेच रुग्ण अत्यवस्थ होऊन त्यांना ऑक्सिजनची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालय, डेडीकेटेड कोविड रुग्णालय आणि सर्व खासगी कोरोना रुग्णालयात असलेले आयसीयु बेड आणि ऑक्सिजनचे बेड जवळपास फुल्ल आहेत. या सर्व ठिकाणी मिळून तब्बल १०९४ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत. त्यात जिल्हा रुग्णालयात ४९०, डेडीकेटेड कोविड रुग्णालयात ६२ आणि २३ खासगी कोरोना रुग्णालयात ५४२ असे एकूण १०९६ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.

जिल्ह्याची आरोग्य स्थिती अत्यंत भयावह
कोरोनाबाधितांच्या मृत्यूचा आकडा दिवसागणिक वाढतच आहे. रविवार, दि. २५ एप्रिल रोजी जिल्ह्यात ३९ मृत्यू झाले. यातील २७ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, तीन मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर, तर नऊ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. यातील तिघे जण जिल्ह्याबाहेरील आहेत. गत २४ तासात १ हजार १०५ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. तर पॉझिटिव्ह असलेल्या ८१० जण कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

प्रयोगशाळेकडून रविवारी एकूण पाच हजार ७७४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी एक हजार १०५ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर चार हजार ६६९ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा हजार २२८ रुग्ण ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह असून, यापैकी रुग्णालयात भरती दोन हजार ७९०, तर गृहविलगीकरणात तीन हजार ४३८ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४७ हजार ८०९ झाली आहे. गेल्या २४ तासात ८१० जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ४० हजार ४६९ आहे. तर जिल्ह्यात एकूण एक हजार ११२ मृत्यूची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर १२.३६ असून, मृत्युदर २.३३ टक्के आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरासह तालुक्यातील तब्बल १३, कळंब तालुक्यातील दोन, नेर दोन, उमरखेड दोन, वणी चार, बाभुळगाव, पांढकरवडा, नागपूर, माहूर तालुक्यातील प्रत्येकी एका जणाचा समावेश आहे.

जिल्ह्यातील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर मध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये पुसद येथील एक आणि दारव्हा येथील दोघांचा समावेश आहे. खासगी रुग्णालयात मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील दोन, वणी एक, दिग्रस, पांढरकवडा, वाशिम येथील प्रत्येकी एक आणि पुसद येथील तिघांचा समावेश आहे. रविवारी पॉझिटिव्ह आलेल्या एक हजार १०५ जणांमध्ये ५८२ पुरुष आणि ५२३ महिला आहेत. आतापर्यंत तीन लाख ८६ हजार ९०१ नमुने तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे. यापैकी तीन लाख ८२ हजार ५३ प्राप्त, तर चार हजार ८४८ अप्राप्त आल्याचे आरोग्य विभागाने कळवले आहे.

७ दिवसांत २२६ मृत्यू
दिनांक मृत्यूसंख्या
१९ एप्रिल ३७
२० एप्रिल २९
२१ एप्रिल ३९
२२ एप्रिल ३७
२३ एप्रिल २५
२४ एप्रिल २०
२५ एप्रिल ३९

खासगीत बेड शिल्लक, तरी नसल्याची कुरबूर
जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण ५७७ बेड रुग्णांसाठी उपयोगात आहेत. तर जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये एकूण २४० बेड पैकी १८६ रुग्ण सध्या आहेत. यातून ५४ बेड शिल्लक, तर ३३ कोविड केअर सेंटरमध्ये एकूण दोन हजार ५७३ पैकी एक हजार २१२ बेड शिल्लक आहेत. विशेष म्हणजे २४ खासगी कोविड रुग्णालयात एकूण ८०५ बेड आहेत. यातील ६२४ उपयोगात, तर १८१ बेड शिल्लक आहेत. तरीसुद्धा खासगीत नसल्याचीच कुरबूर सुरू आहे.

अत्यवस्थांची संख्या वाढतेय
जिल्ह्यात बरेच रुग्ण कोरोनाची लागण झाल्यानंतरही वेळात उपचार घेताना दिसत नाही. त्यामुळे अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. अशा अवस्थेत रुग्णांना वाचवण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करतात मात्र रुग्ण उशीरा आला असल्याने अनेकदा त्यांना यश येत नाही.

टँकरला उशीर होताच वाढते धडधड
जिल्हा रुग्णालयात १२०० ते १३०० जम्बो ऑक्सिजन सिलिंडर दरदिवशी लागतात. वर्धा येथून ऑक्सिजनचा टँकर येतो. त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. एखादेवेळी टँकरला थोडा जरी उशीर झाला तर धडधड सुरू होते. - डॉ. मिलींद कांबळे, वैद्यकीय अधिष्ठाता, यवतमाळ

बातम्या आणखी आहेत...