आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

यवतमाळ:चार वर्षीय चिमुकल्यासह आईने प्राशन केले विषारी औषध, दोघांचाही मृत्यू; मृतक आई विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उमरखेड तालुक्यातील अनंतवाडीतील धक्कादायक प्रकार

शेतातील पिकांवर फवारणी करण्याकरता आणलेले विषारी औषध चार वर्षीय चिमुकल्याला पाजून आईने आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी येथे गुरूवार, दि. 18 ऑगस्टला दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बिटरगाव पोलिस ठाण्यात शनिवारी मृत आईविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. सम्राट विशाल रणमले वय 4 वर्ष आणि सविता विशाल रणमले वय 32 वर्ष दोघेही रा. कुपटी ता. माहुर अशी मृतक माय-लेकांची नावे आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, माहुर तालुक्यातील कुपटी येथील विशाल रणमले याने पत्नी सविता हिला चार वर्षीय चिमुकल्या सम्राट याच्यासह नागपंचमीसाठी तिच्या माहेरी उमरखेड तालुक्यातील अनंतवाडी येथे पाठविले होते. अशातच 18 ऑगस्टला सविता ही चिमुकल्या सम्राट याला घेवून भाऊ पवन मुकाडे याच्यासोबत शेतात गेली होती. यावेळी सविताचा भाऊ पवन हा शेतातील पिकांवर फवारणी करीत होता. तर फवारणीचे औषध त्याने शेतातील एका टाकीजवळ ठेवले होते. दरम्यान ते विषारी औषध सविताने चार वर्षीय चिमुकल्याला पाजले, त्यानंतर स्वत:ही प्राशन केले. काही वेळातच भाऊ पवन हा फवारणी आटपून सविताकडे गेले असता, ती शेतातील टाक्याजवळ पडून दिसली आणि तिच्याच बाजूला चार वर्षीय सम्राट देखील पडलेला होता. यावेळी पवन याने विचारपूस केली असता सविता हीने सम्राटला विषारी औषध पाजून स्वत:ही प्राशन केल्याचे सांगितले. सविताच्या तोंडाला फेस येत असल्याचे बघून पवनच्या पायाखालची जमीनच सरकली. ़

घटनेची माहिती कुटुंबीयांसह गावकऱ्यांना देण्यात आली. त्यानंतर दोघांनाही प्रथम फुलसांगवी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यानंतर सावना येथील रुग्णालयात आणण्यात आले. मात्र, त्या दोघांचाही उपचारादरम्यान दुर्देवी मृत्यू झाला. या प्रकरणी महागाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. त्यानंतर प्रकरण बिटरगाव पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आले. या प्रकरणी सविता हीचा भाऊ पवन मुकाडे रा. अनंतवाडी यानी दिलेल्या तक्रारीवरून मृत सविता रणमलेविरूध्द बिटरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास बिटरगाव पोलिस करीत आहे.