आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसही चक्रावले:राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नव्या रस्त्याच्या दुतर्फा लावलेली 35 हजार झाडे चोरीला; अवधुतवाडी पोलिस ठाण्यात तक्रार

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ पांढकवडा रस्त्याचे चौपदरीकरण, रुंदीकरण व उड्डाण पुल तयार करतेवेळी कत्तल केलेल्या झाडांच्या जागेवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने ३५ हजार झाडे लावले असल्याची माहिती माहितीच्या अधिकारात दिली आहे. मात्र आज रोजी त्या ठिकाणी एकही झाड लावलेले दिसत नसल्याने ही या मार्गावर लावलेली ३५ हजार झाडे चोरी गेली असल्याची तक्रार पालिकेचे माजी उपाध्यक्ष दत्ता कुळकर्णी यांनी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात दिली आहे. रस्त्याच्या कडेला लावलेली ३५ हजार झाडे चोरी गेल्याची तक्रार प्राप्त झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.

या प्रकरणी देण्यात आलेल्या तक्रारीनुसार, शहरातील शारदा चौक ते चौपाल सागर या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. याशिवाय बुटीबोरी-तुळजापुर या महामार्गाचे काम सुरू असताना याच चौफुलीवर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने एक उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे. या कामासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चारही बाजुला असलेल्या रस्त्यांवरील सुमारे ८० वृक्ष तोडले होते. हे वृक्ष तोडण्यासाठी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने नगर पालिकेकडे २३ मे २०१९ रोजी परवानगी मागीतली. त्यावर हे वृक्ष तोडल्यानंतर त्या रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी २ मीटर अंतरावर एक झाड याप्रमाणे किमान ८०० वृक्ष लावावे तसेच हे लावलेले वृक्ष जगविण्याची जबाबदारी तुमची राहील अशा अटीच्या आधीन राहुन नगर पालिकेने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणास ६ जुन २०१९ रोजी परवानगी दिली.

दरम्यान या मार्गाचे काम पुर्ण झाल्यानंतर दत्ता कुळकर्णी यांनी २३ जुलै २०२१ रोजी माहितीच्या अधिकारात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाला पत्र दिले. त्यात यवतमाळ नगर पालिकेने दिलेल्या परवानगीनुसार राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने संबंधीत रस्त्याच्या दुतर्फा कीती झाडे लावली याची माहिती मागीतली. त्यावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने ३५ हजार २१४ वृक्ष लावल्याची माहिती दिली. त्यावरुन दत्ता कुळकर्णी यांनी नगर पालिकेकडे माहितीच्या अधिकारात पत्र देत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने या मार्गाच्या दुतर्फा किती झाडे लावली याची माहिती मागीतली. त्यावर पालिकेने वृक्ष लावलेले नाही अशी माहिती दिली. त्यानंतर दत्ता कुळकर्णी यांनी स्वत: जावुन या मार्गावर पाहणी केली असता एकही झाड लावलेले आढळुन आले नाही. त्यामुळे या मार्गावर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने लावलेली ३५ हजार २१४ झाडे चोरी गेली असावी असा संशय त्यांना आला. त्यावरुन त्यांनी तातडीने अवधुतवाडी पोलिस ठाणे गाठून संबंधीत रस्त्यावर लावण्यात आलेली ३५ हजार २१४ झाडे चोरी गेली असल्याची तक्रार दिली.

आर्णी मार्गावरील झाडेही वाळली
शहरातील बसस्थानक चौक ते वनवासी मारोती या मार्गावर राणा प्रताप गेट ते अमृत सेलिब्रेशन या दरम्यान रस्त्याच्या दुभाजकामध्ये मोठी पामची झाडे लावण्यात आली होती. मात्र ती झाडे लावल्यानंतर त्याच्या देखभालीसाठी कुठलेही प्रयत्न करण्यात आले नसल्याने ती झाडे वाळुन गेली आहेत. महागडी झाडे लावल्यानंतर त्यांना जगविण्यासाठी प्रयत्नच झाले नसल्याने खर्चही वायफळ ठरला आहे.

बांधकामाच्या खर्चातच व्हावे वृक्षलागवडीचे नियोजन
एखादा रस्ता तयार करतेवेळी त्याच्या बांधकामासाठी लागणाऱ्या खर्चाचे एस्टिमेट तयार करण्यात येते. हे अस्टीमेट तयार करतेवेळी त्या रस्त्याच्या दुतर्फा झाडे लावणे आणि ती झाडे जगवणे यासाठी लागणारा खर्चही त्या इस्टीमेटमध्ये समाविष्ट केल्यास वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन योग्य पद्धतीने होवु शकते. शहरातील धामणगाव मार्गासाठी केलेला हा प्रयोग यशस्वी झाला असल्याचे दिसत आहे.

आता जनहित याचिका

कुठल्याही शासकीय कार्यालयाला माहितीच्या अधिकारात खोटी माहिती देता येत नाही. त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागाने दिलेली माहिती खरी आहे असे समजुन मी लावलेले वृक्ष पाहण्यासाठी गेलो. मात्र हे वृक्ष चोरी गेल्याचा संशय आला. त्यामुळे याची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. आता ही माहिती खोटी आढळल्यास जनहित याचिका दाखल करणार आहे. दत्ता कुळकर्णी, माजी उपाध्यक्ष, नगर पालिका

माहिती मागवली
या प्रकरणात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून नगर पालिका आणि राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग या दोन्ही विभागाकडे संबंधीत प्रकरणात माहिती मागवण्यात आली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
मनोज केदारे, ठाणेदार, अवधुतवाडी पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...