आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस म्हणजे चोवीस तास जनतेच्या सेवेत तत्परतेने हजर असलेला कर्मचारी. ऊन-वारा-पाऊस काहीही असो, तो कर्तव्यावर हजर दिसणारच. शिवाय पोलिसांची सेवा हीच मुळात चोवीस तास सेवा मानली जाते. हे कर्तव्य बजावताना त्यांना आलेला थकवा आणि इतर अडचणी कर्तव्यापुढे गौण ठरतात. अशा या जनतेच्या सेवकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. किमान साप्ताहिक सुटीचा पुरेपूर आनंद या पोलिसांना आता उपभोगता येईल. कारण, साप्ताहिक सुटीच्या आदल्या दिवशी या पोलिसांना आता रात्रपाळीची ड्यूटी दिली जाणार नाही.
रजा असो वा सुटी, अत्यावश्यक सेवा म्हणून कोणत्याही क्षणी कर्तव्यावर हजर राहण्याचे आदेश आले की पोलिसांना हजर राहावेच लागते. शिवाय साप्ताहिक सुटीचा दिवस कसाबसा तणावाविना जाईल म्हटले तर नेमकी आदल्या दिवशी नाइट ड्यूटी असते आणि सुटीचा िदवस मग वाया जातो. अशा सुटीच्या आदल्या दिवशी रात्रपाळी देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेण्यात यावा, असे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी दिले आहेत. तत्पर सेवा आणि अहोरात्र कर्तव्यदक्षता हे पोलिस दलाचे ब्रीद आहे. त्यामुळे सामाजिक तणाव असो अथवा राजकीय सभा-मेळावे, अशा सर्वच वेळी पोलिसांचा बंदोबस्त लावलेला असतो. शिवाय, एखादा कार्यक्रम असेल तर ताे किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल हे कुणालाच ठाऊक नसते. विशेषत: राजकीय कार्यक्रमांत असे घडते. अशा वेळी पोलिस दिवसभर बंदोबस्तात राहतात.
हक्काच्या रजा आणि सुट्यांचे लाभ कसेबसे हे पोलिस घेऊ शकतात. परंतु, यातही सुख नसते. कारण, एखादा बंदोबस्त किंवा अगदीच आणीबाणी नसली तरी या पोलिसांना सुटी-रजेच्या आदल्या दिवशी गस्त किंवा तत्सम कर्तव्यावर नेमले जाते. या दिवशी आलेला थकवा दुसऱ्या दिवशीच्या सुटीचा आनंद खाऊन टाकतो. मग सुटी अगदीच निरर्थक ठरते. नेमकी ही बाब पोलिस महासंचालकांनी हेरली आहे.
यापुढे पोलिस घटकप्रमुख यांनी पोलिस अधिकारी, कर्मचारी यांच्या साप्ताहिक सुटीपूर्व दिवसाच्या कामाचे योग्य नियोजन करावे, जेणेकरून त्यांना देण्यात येणाऱ्या साप्ताहिक सुटीचा उद्देश यशस्वी होईल, अशा आशयाचे पत्र नुकतेच राज्याचे पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी सर्व पोलिस घटकप्रमुख यांना पाठवले आहे. त्यामुळे आता या निर्देशानुसार कारवाई होऊन पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना मिळणारा साप्ताहिक सुटीचा दिवस निवांत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.