आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविदर्भात पावसाने कहर केला आहे. संततधार पावसामुळे अनेक संसार उघड्यावर आले. अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने त्वरित मदत द्यावी, शेतकऱ्यांचा अंत पाहू नये, मदत न दिल्यास व्यवहारी मार्गाने मदतीची मागणी येत्या अधिवेशनात करणार असल्याचे माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी वर्धेच्या दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि संसार उघड्यावर आलेल्यांचा नव्याने संसार थाटावा आणि शेतकऱ्यांना पेरणीकरिता जी मदत राज्य सरकारकडून केली जाते त्याकरिता राज्य सरकारने मोठमोठ्या कंपन्यांची मदत घ्यावी, असे माजी उपमुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.
बऱ्याच वर्षांनंतर विदर्भात मुसळधार पावसामुळे हाहाकार झाल्याचे चित्र निर्माण झाले. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कृषी विभागाने लक्ष केंद्रित करावे आणि प्रशासनाला सोबतीला घेऊन त्वरित पंचनामे करावे. शेतकऱ्यांच्या विहिरी या पावसामुळे खचल्या असल्याने रोजगार हमी योजना विभागाने त्या विहिरी बांधून देण्याची तरतूद करावी. जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील अनेक नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली असून, ३१ जुलैपर्यंत पंचनामे होणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले असल्याचे पवार म्हणाले. मागील वेळी मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असता, महाविकास आघाडी सरकारने त्वरित मदत दिली होती. त्याच प्रमाणे शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांचा अंत न पाहता मदत द्यावी, असा अल्टिमेटम विरोधी पक्षनेते अजित पवारांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.
पुरामुळे पिण्याचे पाणी दूषित असल्याने आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात असेही त्यांनी सांगितले आहे. मंत्रिमंडळ स्थापन करण्यासाठी दिल्ली येथून ग्रीन सिग्नल आल्यास मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचा टोला या वेळी पवारांनी लावला. आरोप करणाऱ्यांनी आरोप करत रहावे अजित पवार हा कुणाच्या आरोपाला घाबरत नसल्याचेही ते म्हणाले. या पत्रकार परिषदेत सुरेश देशमुख, राजू तिमांडे, सुधीर कोठारी, सुबोध मोहिते आणि राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.