आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतळ्याचे अनावरण:श्रीराम आसेगावकर यांचा पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल; माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

पुसद15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, सहकार, शिक्षण अशा विविध क्षेत्रांत कार्य करताना सहकार्याची बांधीलकी जपणारे श्रीराम अप्पाजी आसेगावकर यांचा पूर्णाकृती पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल, असे सांगताना माजी अर्थ व नियोजन मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी शनिवारी सुरू असलेल्या राजकारणावर भाष्य केले. पुसद परिसरातील सहकारमहर्षी दिवंगत श्रीराम आसेगावकर यांच्या श्रीरामपुरात कार्ला मार्गावर उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते नुकतेच पार पडले. त्यावेळी ते बोलत होते.

मी आणि माझा परिवार ही भावना आज वाढत आहे. प्रत्येकाच्या आशा-आकांक्षा वृद्धिगंत होत आहेत. दोहन ऐवजी शोषण होत आहे. कुटुंब, समाजातील एकमेकांना मदत करण्याची भावना नाहीशी होत आहे. अशा स्थितीत श्रीराम अप्पाजी आसेगावकर यांचा पूर्णाकृती पुतळा समाजाला शुद्ध विचारांची दिशा देईल, अशी अपेक्षा मुनगंटीवार यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार मदन येरावार होते. यावेळी व्यासपीठावर आमदार समीर कुणावार, आमदार इंद्रनील नाईक, आमदार नामदेव ससाने, माजी मंत्री डॉ. एन.पी. हिराणी, माजी आमदार विजय पाटील चोंढीकर, माजी नगराध्यक्ष अनिता नाईक, कृषिभूषण दीपक आसेगावकर, विजया आसेगावकर, माजी नगराध्यक्ष सतीश बयास, ॲड.आशिष देशमुख, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते राजन मुखरे, डॉ. आनंद मुखरे, धनंजय तांबेकर, लक्ष्मण जाधव, न.प.पुसदचे मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड, श्रीरामपूर ग्रामपंचायतीचे सरपंच आशिष काळबांडे यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व श्रीराम ऑक्सी-पार्कचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. या ऑक्सी-पार्कमधील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक व अप्पाजी यांच्यासोबतच्या बोलक्या स्मृतीशिल्पाने काही क्षण सर्वांच्याच नजरा खिळविल्या. श्रीराम अप्पाजी यांच्या ३४ व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमाच्या नीटनेटक्या, सर्वांगसुंदर कार्यक्रमाची आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी प्रशंसा केली.

ते म्हणाले की, पुसदच्या विकासात नाईक परिवाराचे मोठे आहे. या योगदान कार्याला सहकार व नियोजनातून आप्पाजींनी आधार दिला. त्यांनी सूत गिरणीतून शेतकरी व कामगारांचे हित जोपासले. त्यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यांनी आर्य वैश्य समाजात सुधारणा करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रास्ताविक शब्दप्रभू डॉ. उत्तम रुद्रवार यांनी केले. त्यांनी अप्पाजींच्या कर्तृत्वाचा मळा सुंदर शब्दात गुंफला. आमदार इंद्रनील नाईक यांनी नाईक व आसेगावकर परिवार यांच्यातील सहकार,

सलोखा व विश्वासाचे अनोखे अनुबंध प्रामाणिक शब्दांतून उलगडले. आमदार समीर कुणावार म्हणाले, त्यांचे कार्यकर्तृत्व अनुकरणीय आहे.

सहकार, शिक्षण, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील कार्य प्रेरणादायी आहे. आर्य वैश्य समाजातील वधू वर परिचय मेळावे, हा अप्पाजींनी दिलेला मंत्र आहे. केवळ स्वतःसाठी नव्हे तर लोकांसाठी काम करा, हा संदेश त्यांनी जीवन कार्यातून दिला आहे.सुरुवातीला प्रा. चंद्रकिरण घाटे यांनी वंदन गीत सादर केले. सूत्रसंचालन मनीष अनंतवार यांनी केले तर दीपक आसेगावकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...