आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासकाळची शाळा सुटल्यानंतर घरी परत जाण्यासाठी वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी आज ६ मार्च रोजी म्हैसवाडी येथील असंख्य विद्यार्थी व विद्यार्थीनीनी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे व म्हैसवाडीचे पोलिस पाटील योगेश पाटील यांच्या नेतृत्वात येथील आगारात धडक दिली. यावेळी आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांना विद्यार्थी विद्यार्थिनींनी वेळेवर बस उपलब्ध करण्याची मागणी करत उद्भवत असलेली व्यथा कथन केली. काही दिवसापासून इयत्ता बारावी व दहावीची बोर्डाची परीक्षा सुरू झाल्यामुळे सकाळची शाळा सुरू झाली आहे. साडे दहा वाजता शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी परत जाण्यासाठी बसची वाट पाहत ताटकळत उभे राहावे लागत आहे.
घरी येण्यास उशीर होत असल्याने पालकही चिंतेत पडतात. वेळेवर बस उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना तालसवाडा फाटा ते म्हैसवाडी असे पाच ते सहा किलोमीटर अंतर पायपीट करीत पार करावे लागते. ही बाब उपस्थित विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांच्या निदर्शनास आणून देत वेळेवर बस उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आगार व्यवस्थापक मुकुंद नावकर यांच्याकडे रेटून धरली.
या समस्येवर मुकुंद नावकर यांनी तातडीने मार्ग काढण्याच्या संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी पत्रकार मनोज पाटील, शिवसेना तालुका उपप्रमुख गजानन धाडे व पत्रकार श्रीकृष्ण तायडे यांनी समन्वयाची भूमिका निभावली. आज व उद्या शाळेला सुटी असल्यामुळे परवापासून शाळा सुटण्याच्या वेळेवर बस उपलब्ध करण्याची मुकुंद नावकर ग्वाही दिली. यावेळी विद्यार्थिनी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.