आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी येथील विद्यार्थ्यांना मागील सहा महिन्यांपासून गणित व अन्य विषय शिकवायला शिक्षकच नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. परिणामी वसंत आदिवासी विद्यालयातील विद्यार्थी व पालकांनी गुरुवार, २ फेब्रुवारी रोजी जिल्हाकचेरीवर धडक दिली व कार्यालयाच्या परिसरातच शाळा भरवली. पार्डी नस्करी येथील वसंत आदिवासी विद्यालयातील वर्ग आठवी ते दहावीचे शंभरावर विद्यार्थी या ठिकाणी आले होते.
यावेळी पालकांनी शाळेवर प्रशासकाची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी केली. शाळेतील कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत राजकारणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणीक भविष्य धोक्यात आले असून, शाळेत कुठल्याच प्रकारच्या सोयीसुविधा नसल्याची खंत पालकांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बाकडे नसून, प्रयोगशाळा देखील नाही. शाळेला दरवाजे काय, शौचालयसुद्धा नसल्याने मुलींची मोठी कुचंबणा होत असल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
अकरावी व बारावीची मान्यता नसतानासुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आल्याने अनधिकृत वर्गही चालवले जात असल्याचे यावेळी पालकांनी सांगितले. विद्यार्थ्यांची होणारी अडचण पाहता ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांना घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयच गाठले. या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला. शाळेच्या संचालक मंडळात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होत असल्याचा आरोपदेखील ग्रामस्थांनी केला आहे. यावेळी विद्यार्थी, पालक, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आदी उपस्थित होते..
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.