आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीटंचाई:दारव्ह्यातील पाणी प्रश्न कायम; नगरपरिषदेचा नियोजनशून्य कारभार, 34 कोटींची योजनाही ठरली दिवास्वप्न

दारव्हाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या आणि राज्याच्या राजकारणात आपली छाप सोडणाऱ्या दारव्हा शहरातील नागरिकांच्या नशीबी कायमच उपेक्षा आल्या आहे. रस्ते, पाणी, वीज यासारख्या मुलभूत सुविधांसाठी ही दारव्हेकरांना संघर्ष करावा लागत आहे. पाणीटंचाई हा शहराचा ज्वलंत प्रश्न आहे. आजवर पाण्यासाठी कोट्यवधींचा खर्च झाला असला तरी अनेक प्रभागातील नागरिक तहानलेले आहे. त्यामुळे पाणीटंचाईचे हे पाप कुणाचे असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दारव्हा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी अडाण, कुपटी नदी आहे. पेकर्डा येथून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या योजनांवरून शहराला पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने शक्य नसल्याच्या कारणातून दिग्रस येथील अरुणावती प्रकल्पावरून साडेसहा कोटींची योजना मंजूर करून कामही करण्यात आले. हा संपूर्ण विषय भूतकाळाचा असला तरी प्रत्यक्षात शहराचा पाणीपुरवठा वर्तमान स्थितीत सुटला का तर त्याचे उत्तर नाहीच आहे. गत तीन वर्षांपासून ३४ कोटी ३४ लाखांच्या पाणीपुरवठा योजनेचे स्वप्न दाखविले जात आहे. या योजनेमुळे शहरात कधीच पाणीप्रश्न निर्माण होणार नाही, असे वारंवार सांगण्यात येत आहे.

या योजनेतून जलकुंभासह जॅकवेल, पाइपलाइन आदी कामे झाली आहे, असे सांगण्यात येत असले तरी पाणी कुठे मुरत आहे, हे समजायला मार्गच नाही. सदर योजनेची डेडलाइन संपून गेलेली आहे. काम वेळेत पूर्ण न झाल्याने यवतमाळ मजीप्रा कार्यालयाकडून संबंधित एजंन्सीचा प्रस्ताव अमरावती कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता. सदर एजन्सीला कळ्या यादीत टाकावे, असे प्रस्तावात नमूद होते, असे सांगण्यात येत होते. त्यानंतर राजकीय घडामोडीतून कंत्राटदाराने आपली बाजू सावरली. पुन्हा जोमाने कामही सुरू केले. मात्र उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना अद्याप पाणी आले नाही. शहरातील अनेक भागांना बारोमास पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. उन्हाळ्यात हा प्रश्न अधिक गंभीर बनतो. सध्या पाणीटंचाईने दारव्हेकर हैराण आहे. अशावेळी रोष व्यक्त होत असताना सुद्धा नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारात कुठलीही सुधारणा होताना दिसत नाही. मुलभूत प्रश्नांचीच सोडवणूक होत नसेल आणि त्यावरच वारंवार खर्च करून विकासाचा गाजावाजा होत असेल तर हे मोठे दुर्देव आहे.

टँकर वाटपातही ढिसाळ नियोजन पद्धत
धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा शिल्लक असूनही पालिकेच्या नियोजनशून्य पद्धतीमुळे नागरिकांना नळा ऐवजी टॅँकरने पाणी भरावे लागत आहे. परंतू टँकरने होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुद्धा पालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नसून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

लालदिवा कायम, प्रश्न मात्र जैसे थे
दारव्ह्याचा नेहमीच जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात मोठा दबदबा राहिला आहे. राज्यात सत्ता कुणाचीही असो, ‘लालदिवा’ दारव्ह्याला हमखास मिळतो, हे समीकरण आजवर अनुभवायला मिळाले आहे. माणिकराव ठाकरे आणि संजय राठोड यांच्या रुपाने दारव्ह्याला मंत्रीपद मिळाले. सध्या संजय राठोड मंत्री नसले तरी, त्यांची आज ना उद्या वर्णी लागेल, यात शंका नाही.

बातम्या आणखी आहेत...