आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वास्तव:बाललैंगिक अत्याचारात झाली वाढ, दहा महिन्यांत 158 घटनांची पोलिस दप्तरी नोंद

मयूर वानखडे | यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजच्या धकाधकीच्या काळात समाजकंटकापासून लहान मुलेही सुरक्षित राहिलेली नाही. सतरा वर्षांपेक्षा लहान मुलांवर लैंगिक अत्याचाराच्या तब्बल १५८ घटनांची नोंद गेल्या दहा महिन्यात पोलिस दप्तरी झाली आहे. ही भयानक आकडेवारी पाहता पालकांनो आपली पाल्य सांभाळा, अशी म्हणण्याची वेळ आता आली आहे. लहान मुलांच्या निष्पाप आणि अजाणतेपणाचा फायदा घेऊन करण्यात येणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाल लैंगिक शोषणाच्या प्रकारांवर आळा घालण्यासाठी कठोर धोरणाची तसेच शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.

असे असले तरी अन्याय अत्याचाराची प्रकरणे थांबलेली नाही. समाजात दिवसेंदिवस हरवत चाललेली नैतिकता ही या प्रकारांमागील प्रमुख कारण असल्याचे तज्ञांचे मत आहे. शासनाने सन २०१२ मध्ये बालकांच्या लैंगिक छळास प्रतिबंध अधिनियम (द प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स सेक्श्युअल ऑफेन्सेस अ‍ॅक्ट) ची तरतुद केली. असे असतानाही बालकांच्या लैंगिक शोषणाचे प्रकार कमी झालेले दिसुन येत नाही. उलट सातत्याने वाढ होत चाललेली आहे. जिल्ह्यात जानेवारी २०२२ पासुन घडलेल्या अशा प्रकारच्या गुन्ह्यांची आकडेवारी पाहता ही बाब लक्षात येते.

गेल्या दहा महिन्यात जिल्हाभरात अशा प्रकारची १५८ प्रकरणे घडली आहे. त्यासंदर्भात संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास सर्वच गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दहा वर्षांपूर्वी बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे १४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता ही आकडेवारी कितीतरी पटीने वाढल्याचे स्पष्ट दिसत आहे. बाल लैंगिक नवीन कायद्यानुसार दोषींवरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास किमान तीन वर्षांपासून १० वर्षांपर्यंतच्या सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. शिवाय गुन्ह्याचा प्रकार अती गंभीर स्वरुपाचा असल्यास दोषीला जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे.

दामिनी पथकाकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बाललैंगिक अत्याचार, वाढते गुन्हे रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील शाळेत दामिनी पथकाकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे. त्यामध्ये गुड टच बॅड टच, मुल-पालक संवाद, बाल पोलिस मित्र, पोलिस काका, पोलिस दीदी या माध्यमातून विद्यार्थ्यांशी जवळीक साधणे, शालेय विद्यार्थिनींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात येत आहे. मुलींच्या अडचणी आणि तक्रारी जाणून घेण्यात येत आहे.

समाजानेही पुढाकार घेण्याची गरज
कायद्याने गुन्हेगारांवर कारवाई करता येऊ शकते, त्यांच्या प्रवृत्तीवर नाही. अशा प्रकारचे गुन्हे घडण्यास कारणीभुत ठरणारी प्रवृत्ती बदलण्यासाठी समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याला कठोर कायद्यांची मदत ठरु शकते. स्वत:च्या मुलांप्रमाणे इतरांच्या मुलांसंदर्भात ही भावना बाळगल्यास अशा प्रकारचे गुन्हे आपोआप कमी होतील.

जागरूक राहण्याची गरज
समाजात नैतिकता दिवसेंदिवस लोप पावू लागली आहे. शाळेत शिकणाऱ्या लहाण मुलांपर्यंत अनेकजण अशा अत्याचाराला बळी पडताना दिसुन येत आहे. असे प्रकार घडल्यानंतर पोलिस कारवाई करतील, मात्र त्यावर आळा घालण्यासाठी पालकांनीच जागरूक राहण्याची गरज आता जाणवू लागली आहे.
डॉ. अंजली गवार्ले, यवतमाळ.

नुकत्याच घडल्या ह्या घटना
अवधुतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी, त्याचप्रमाणे मारेगाव तालुक्यातील रामपूर येथेही अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. तर कळंब तालुक्यात अत्यंत घृणास्पद प्रकार घडला. चक्क मामाने त्याच्या अल्पवयीन भाचीवर वाईट नजर ठेवली होती. या सर्व घटनांमध्ये पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहे. नोंद केलेल्या १५८ घटनांमधील काही प्रकरणात मुलेही शिकार झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...