आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या दीड वर्षांपूर्वी तालुक्यातील दाभडी येथील एका प्रेमी युगुल गावातून पळून गेले होते. त्यानंतर त्यांचा आजपर्यंत कुठलाही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना नव्हता. अश्यात गुरुवार, दि. ९ मार्चला सकाळी दाभडी येथील जंगलात एक व्यक्ती मोहोळ झाडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला काही संशयास्पद वस्तू आढळल्या. त्याची माहिती त्याने पोलिसात दिली. त्यानंतर प्रेमी युगुलाचे जंगलात मृतदेह आढळल्याच्या चर्चेने संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली. मात्र, कुठलाही मृतदेह तेथे आढळला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत कपडे, चप्पल, दात आणि हाडाचे अवशेष जप्त केले आहे. या प्रकरणी प्राप्त माहितीनूसार, आर्णी तालुक्यातील दाभडी येथील एका तरुणाचे आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम जडले. मात्र, कुटुंबीय या लग्नाला होकार देणार नाही, अशी भीती त्यांना होती. त्यातूनच दीड वर्षांपूर्वी ते प्रेमी युगुल गावातून पळून गेले होते. या घटनेची नोंदही त्यावेळी पोलिसांनी घेतली होती.
आजपर्यंत त्या प्रेमी युगुलाचा कुठलाही थांगपत्ता नातेवाईकांसह गावकऱ्यांना नव्हता. दरम्यान, गुरुवारी सकाळी दाभडीच्या जंगलात प्रेमी युगुलाचे मृतदेह सापडल्याची चर्चा सुरू झाली. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार श्याम सोनटक्के पथकासह घटनास्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी घटनास्थळाची आणि आसपासच्या परिसराची बारकाईने पाहणी केली. मात्र, तेथे कुठलाही मृतदेह आढळून आला नाही. मात्र तेथे कुजलेल्या अवस्थेतील कपडे, मोबाईल, हाडाचे बारीक तुकडे, दातांचे तुकडे, केस अशा संशयास्पद बाबी आढळून आल्या. या गंभीर बाबीची माहिती मिळताच दारव्ह्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे देखील तेथे पथकासमवेत दाखल झाले. त्यांच्या समक्ष पोलिसांनी संशयास्पद बाबींचा पंचनामा केला. तसेच ते अवशेषही जप्त करण्यात आले. आता ते अवशेष प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे. घटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक गणपत काळुसे, फौजदार शिवराज पवार, बाबाराव पवार, जमादार सतीश चौधर, मुनेश्वर, शिपाई मिथून चव्हाण, मनोज चव्हाण, योगेश संकुलवार आदी उपस्थित होते. या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली आर्णी पोलिस करीत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.