आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेतन वसुली:अतिरिक्त वेतन वसुलीचा अद्यापही थांगपत्ताच नाही

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद बांधकाम विभागातील बारा कर्मचाऱ्यांच्या खात्यात ऑक्टोबर महिन्याच्या वेतनासोबत अतिरिक्त पैसे वळते करण्यात आले होते. ह्या प्रकाराला सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे, परंतु अद्यापही अतिरिक्त रक्कम कुठल्याही कर्मचाऱ्याने जमा केली नाही. यासंदर्भात कार्यकारी अभियंत्यांना सुद्धा कुठल्याही प्रकारची कल्पना नाही हे विशेष.

जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्रमांक एकमधील २६, कृषी दोन आणि आरोग्य विभागातील ५, अशा मिळून ३३ दांडीबहद्दर कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्वच विभाग प्रमुखांना दिले होते. या आदेशानुसार बांधकाम विभाग क्रमांक एक मधील काही कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन ऑक्टोबर महिन्याच्या वेतनातून कपात केले. तर बांधकाम विभागातील काही कर्मचाऱ्यांना दिवाळीची विशेष गिफ्ट मिळाली. यात प्रामुख्याने १२ कर्मचाऱ्यांच्या खात्यात अतिरिक्त वेतन अदा करण्यात आले.

साधारणत: सव्वाचार लाखांहून अधिकची रक्कम त्या बारा कर्मचाऱ्यांच्या सात ते आठ दिवसांपासून पडून आहे. ही रक्कम कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र, कार्यकारी अभियंता संजय कुटे यांनासुद्धा कुठलीही कल्पना नसल्याचे त्यांनी दैनिक दिव्य मराठीच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. जिल्हा परिषद वित्त विभागालासुद्धा ह्याबाबत काहीच माहिती नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एकंदरीत शासन तिजोरीला लाखो रूपयांचा फटका बसला असून, जिल्हा परिषद प्रशासन ह्याची दखल घेणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

चुकी केलेल्यांवर कारवाईची अपेक्षा काही वर्षांपूर्वी यवतमाळ पंचायत समितीत सुद्धा असाच काहीसा प्रकार उघडकीस आला होता. शिक्षकांच्या खात्यात अतिरिक्त वेतन वळते केले. याची वसुली करून जमा करण्यात आले होते. मात्र, कामात अनियमितता केल्या प्रकरणी दोघाजणावर निलंबनाची कारवाई केली होती. आता असाच प्रकार बांधकाम विभागात घडल्याने त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...