आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खळबळजनक:12 लाखांचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्यांनी पळवली; यवतमाळमध्‍ये यापूर्वी पण घडली होती अशीच घटना

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बाभुळगावच्या भर चौकातील घटना, चोरट्यांची ओळख पटल्यास संपर्क करण्याचे पोलिसांंकडून आवाहन

सराफा व्यावसायिकाच्या दुकानातून १२ लाख रुपये किमतीचे तीनशे ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पाच लाखांची रोकड असलेली बॅग अज्ञात चोरट्याने मोठ्या शिताफीने पळवल्याची खळबळजनक घटना गुरुवारी ११ फेब्रुवारीला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास शहरातील शिवछत्रपती चौकात घडली. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाला असून घटनेची गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक डाॅ. दिलीप भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी बाभुळगावात दाखल झाले.

बाभुळगाव शहरातील सराफा व्यावसायिक विजय वर्मा हे नेहमीप्रमाणे त्यांचे शिवछत्रपती चौकात असलेले विजय ज्वेलर्स उघडण्यासाठी सकाळी १०.३० वाजता दुकानात आले. त्यांनी दुकानाचे शटर उघडून सोबत असलेली काळ्या रंगाची बॅग दुकानाच्या काउंटर मागे असलेल्या बसण्याच्या खुर्चीवर ठेवली आणि दुकानाची साफसफाई करण्यात व्यस्त झाले. दरम्यान ते दुकानाच्या बाहेर असलेला कचरा साफ करीत असताना त्यांच्या हालचालीवर नजर ठेवुन असलेला एक युवक दुकानात शिरला व त्याने काही क्षणातच खुर्चीवर ठेवलेली बॅग घेऊन तेथून पळ काढला. विजय वर्मा दुकानात परत आल्यावर त्यांना बॅग दिसली नाही. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक युवक बॅग घेवुन दुकानातून बाहेर गेल्याचे निदर्शनात आले. दरम्यान वर्मा यांच्या पायाखालची जमीनच सरकली. यावेळी वर्मांनी तातडीने याबाबत बाभुळगाव पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने शिवछत्रपती चौकातील विजय ज्वेलर्स गाठून पाहणी केली.

यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. ज्यात तो युवक दोन व्यक्तीसोबत पल्सर वाहनावर बसून पसार झाल्याचे दिसून आले. ही घटना मोठी असल्याचे बघताच बाभुळगाव पोलिसांनी याबाबत वरिष्ठांना कळवले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी बाभुळगावात दाखल झाले. विजय वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीनूसार, त्या बॅगमध्ये ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने किंमत १२ लाख, २०० ग्राम चांदी किंमत १४ हजार आणि पाच लाखांची रोख असा एकुण १७ लाख १४ हजार रूपयांचा ऐवज होता. या प्रकरणी बाभुळगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा नोंद केला आहे.

चोरट्यांची ओळख पटल्यास संपर्क करण्याचे आवाहन

बाभुळगाव शहरातील विजय ज्वेलर्स या दुकानातून गुरुवारी सकाळी चोरट्यांनी ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख लंपास केली. या प्रकरणातील चोरटे सीसीटीव्हीत कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या बाबत काही माहिती असल्यास किंवा फोटोवरून संशयित वाटल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

यवतमाळ शहरातही घडली होती अशीच घटना

सुवर्ण कारागीरकडे ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी १६४ ग्रॅमचे सोने किंमत जवळपास आठ लाख रूपये लंपास केले. ही घटना यवतमाळ शहरातील शिवाजी चौक परिसरातील महाकाली मंदिराजवळ ६ ऑक्टोबरला सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी ते दोघे चोरटे मास्क बांधलेल्या स्थितीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. शहर पोलिस श्रीरामपूरपर्यंत गेले होते.

पाच पथकांकडून त्या तिघांचा शोध सुरू बाभुळगाव शहरात भरदिवसा एका सराफा व्यावसायिकाच्या दुकानातून १७ लाखाचा मुद्देमाल असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता स्थानिक गुन्हे शाखेतील दोन पथक आणि बाभुळगाव पोलिस ठाण्यात तीन अशी पाच पथके तयार करण्यात आली असून या पथकांकडून चोरट्यांची शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...