आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरण जमीन भाडेपट्ट्यावर:तीस टक्के कृषिपंप सौरऊर्जेवर आणणार

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागात गावठाण व कृषी वीज वाहिन्यांचे विलगीकरण झाले आहे. अशा कृषी वीज वाहिन्यांचे सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबवण्यात येत आहे.

चार हजार मेगावॅट वीज निर्मितीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाडे पट्ट्यावर घेणार आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, यासाठी सौरऊर्जेवर भर देण्यात आला आहे. येत्या २०२३ या वर्षात ३० टक्के कृषि पंप सौरऊर्जेवर आणण्याचा वीज महावितरणचा प्रयत्न आहे.

गेल्या काही दिवसांपासून कृषि पंपांची वीज समस्या वाढली आहे. रब्बी हंगामात शेतकऱ्यांची विजेची मागणी आहे. मात्र, अडचणींमुळे शेतकऱ्यांपर्यंत वीज पोहोचत नाही. परिणामी शेतकऱ्यांना ओलित करण्यात अडचणी येतात. दिवसा वीज उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्यांना रात्र जागून सिंचन करावे लागते. शेतकऱ्यांनी अडचण दूर करण्यासाठी महावितरणने आता सौरऊर्जेवर लक्ष केंद्रित केले आहे. कृषी वाहिन्यांवरील कृषी ग्राहकांना दिवसा आठ तास वीज देण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे. यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना गतीने राबवण्याचे निर्देश आहेत.

येत्या २०२३ मध्ये जिल्ह्यातील ३० टक्के कृषि पंप सौरवर आणण्याचा प्रयत्न महावितरणचा आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महावितरणने ऑनलाइन लँड पोर्टल सुरू केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या जमिनी प्रती वर्ष ७५ हजार रुपये प्रतिहेक्टर या दराने भाडेतत्त्वावर महावितरण घेणार आहे. योजनेच्या माध्यमातून तीन हजार कृषी वाहिन्यांचे सौर ऊर्जीकरण केले जाणार आहे. १५ हजार एकर जमिनीवरून चार हजार मेगावॅट विजेची निर्मिती केली जाणार आहे. कृषी अतिभारीत उपकेंद्राच्या पाच किलोमीटरच्या परिघात दोन सौर प्रकल्प कार्यान्वित केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना देता येणार भाडेतत्त्वावर
योजनेअंतर्गत कृषी वाहिन्यांचे सौरऊर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खासगी जमीन महावितरणला भाडे पट्ट्याने उपलब्ध करून देता येणार आहे. जागेची त्या वर्षीच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्धारित केलेल्या किमतीच्या सहा टक्के दरानुसार परिगणत केलेला दराने किंवा प्रतिवर्ष ७५ हजार रुपये प्रती हेक्टर जी रक्क‘जास्त असेल त्या दराने वार्षिक भाडेपट्टयाचा दर निश्चित करण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्षी तीन टक्के सरळ पद्धतीने भाडेपट्टी दरात वाढ करण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...