आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:तीस हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधीची प्रतीक्षा

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. यासाठी ६५ हजार ३६४ शेतकऱ्यांची पहिली यादी दिवाळीपूर्वी जाहीर करण्यात आली आहे. यातील ३१ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा झाला आहे. अजूनही अर्ध्या शेतकऱ्यांच्या खात्यात निधी पोहोचला नसल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.

जिल्ह्यातून एक लाख १५ हजार ३५६ कर्ज खात्यांची माहिती पाठवली होती. त्यातील ६५ हजार ३६४ शेतकऱ्यांची पहिली यादी प्राप्त झाली होती. या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रोत्साहन निधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, निधी दिवाळीनंतरही जमा झालेला नाही. शेतकऱ्यांना आपले सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणिकरण करावयाचे होते. आधार प्रमाणिकरण झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बचत खात्यात प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा होणार होती. गेल्या दहा दिवसांपासून आधार प्रमाणीकरणाचे काम सुरू झाले आहे. अजुनही तीन हजार २१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम पोहोचलेली नाही. मात्र, दुसरीकडे ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले आहे. त्या शेतकऱ्यांच्या खात्यातही रक्कम गेलेली नाही.

प्रोत्साहन निधी मिळेल या अपेक्षेने शेतकरी आनंदात होते. दिवाळीनंतरही मदत न आल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. महाविकास आघाडी शासनाने सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा निर्णय घेतला होता. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यात दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. कर्जमाफीसोबत जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांंना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये दिले जाणार आहे. मात्र, अजूनही ३१ हजार ८०२ शेतकर्‍यांच्या हातात पैसे पोहोचलेले नाही. आतापर्यंत ३१ हजार शेतकर्‍यांच्या खात्यात १२१ कोटी रुपये जमा झालेले आहे. परिणामी, उर्वरीत ३१ हजार शेतकऱ्यांना मदत कधी मिळेल या प्रतिक्षेत आहेत.

अधिकृत पोर्टलवर शेतकऱ्यांच्या तीन हजार तक्रारी
नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रूपये प्रोत्साहन अनुदान दिले जात आहे. यासाठी आधार प्रमाणिकरण सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना तक्रारी करता येणार आहे. या पोर्टलवर आतापर्यंत तीन हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आधार क्रंमाक, रक्कम अमान्य, बचत खाते क्रमांक अशा स्वरूपाच्या तक्रारी आहेत. ६५ हजार शेतकऱ्यांपैकी सहा हजार शेतकरी थंब इंप्रेशन व तक्रारीत अडकले आहेत.

बातम्या आणखी आहेत...