आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा दुरुस्ती:शाळा दुरुस्तीचा खर्च झाला तरी, अद्याप अहवाल आलाच नाही

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद शाळांना दुरुस्तीकरिता आठ कोटी ५९ लाख रूपये जिल्हा नियोजन समितीकडून मिळाले होते. त्या अनुषंगाने शाळा स्तरावर निधी वितरीत करून दुरुस्तीची कामे पार पडली, परंतू अद्यापही खर्चाचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर केलाच नाही. परिणामी, उर्वरीत तीन कोटी १२ लाख रूपये अद्यापही प्राप्त होवू शकले नाही. अशा परिस्थितीत प्राथमिक शिक्षण विभागाने खर्चाचा अहवाल सादर करावा, असे पत्र मुख्याध्यापकांना पाठविले आहे.

जिल्ह्यातील बहुतांश शाळा, वर्ग खोली नादुरुस्त आहेत. याच्या देखभाल दुरुस्तीकरिता जिल्हा नियोजन समिती निधी उपलब्ध करून देते, परंतू बऱ्याच वेळा शाळांची निवड योग्यरीत्या केलीच जात नसल्याचे समोर आले आहे. गतवर्षी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला आठ कोटी ५९ लाख रूपये मंजूर करण्यात आले होते. मंजूर झालेल्या निधीतून तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी शाळांची निवड केली होती. मात्र, ही निवड चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप झाला होता.

त्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी यादीत सुधारणा करावी, असे निर्देश दिले होते. दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने जवळपास ४८ कामात बदल केला होता. तर एक कोटी ३ लाख रूपयांचा निधी कमी करून इतर कामावर वळवला होता. असे असताना जिल्ह्यातील सोळाही पंचायत समितीला मिळून ५ कोटी ३ लाख रूपये वितरीत केले होते. हा निधी वितरीत करून बराच कालावधी लोटला आहे. त्यामुळे प्रस्तावित कामे आटोपल्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुख्याध्यापकांनी खर्चाचा अहवाल सादर करणे गरजेचे होते. मात्र, अद्यापही मुख्याध्यापकांनी खर्च केल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला उपलब्ध करून दिलीच नाही. परिणामी, उर्वरीत तीन कोटी १२ लाखांचा निधी जिल्हा नियोजन समितीकडून मिळू शकला नाही.

यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना पत्र पाठवून अहवाल सादर करावा, असे स्पष्ट आदेश दिले आहे. तरीसुद्धा मुख्याध्यापकांना फुरसत मिळत नसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

यु-डायसनुसार शाळांची निवड अपेक्षीत जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय प्राथमिक, माध्यमिक शाळांची इत्थंभूत माहिती यु-डायसमध्ये नमूद केली जाते. यात प्रामुख्याने भौतिक सुविधांची नोंद सुद्धा घेतली जाते. मात्र, बऱ्याच वेळा यु-डायसच्या माहितीकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. मागिल वर्षी निवड केलेल्या यादीवर आक्षेप घेतल्यानंतर ह्यात थोड्याफार प्रमाणात बदल झाला होता. प्रत्यक्षात मात्र, यु-डायसच्या माहितीवरून शाळांची निवड करणे अपेक्षीत आहे.

बातम्या आणखी आहेत...