आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघाटंजी तालुक्यातील पारवा, कुर्ली, चिखलवर्धा येथे बोगस दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार करणाऱ्या तीन डॉक्टरांवर मंगळवार, दि. २१ जून रोजी कारवाई करण्यात आली. या प्रकरणी डॉ. धर्मेश चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांजणा विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. यात अजित अरविंद विश्वास, शरद लक्ष्मण गंपावार, सम्राट सोपान अधिकारी, असे गुन्हा नोंद केलेल्या बोगस डॉक्टरांची नावे आहेत. दोघांना ताब्यात घेतले असून, एक जण फरार आहे.
गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यात बोगस डॉक्टर चांगलेच सक्रीय झाले आहे. कुठल्याही प्रकारचे वैद्यकीय शिक्षणाची नोंदणी न करणाऱ्या बोगस डॉक्टरांनी ग्रामीण भागातील नागरिकांवर बिनधास्त उपचार करणे सुरू केले आहे. यासंदर्भात बऱ्याच वेळा वावड्या उठवण्यात येतात, परंतू थेट कारवाई बोटावर मोजण्याइतक्या प्रकरणात करण्यात आली आहे. अशाच स्वरूपाची गोपनीय माहिती घाटंजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. धर्मेश चव्हाण यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारावर मंगळवार, दि. २१ जून रोजी पारवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पुरम, अरूण खांडरे, अशोक खांडरे यांच्यासह पारवा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सापळा रचून छापा टाकला. यात प्रामुख्याने पारवा येथील मुख्य बाजार लाईन मधील विश्वास दवाखान्यावर धडक दिली. यावेळी बोगस डॉक्टर अजित अरविंद विश्वास वय ६० वर्ष रा. पारवा हे आढळून आली.
त्यांच्याकडे वैद्यक व्यवसायाची कुठलीही नोंदणी झालेले कागदपत्रे आढळून आली नाही. तर ६५७ रूपं याची औषधी त्या ठिकाणाहून जप्त करण्यात आली. त्यानंतर कुर्ला येथील बाजार तळावरील दवाखान्यात रुग्णांवर उपचार सुरू होता. हा बोगस दवाखाना शरद लक्ष्मण गंपावार वय ६० वर्ष, रा. कुर्ली यांचा आहे. त्यांच्याकडे औषधी आणि इतर वस्तू, असे मिळून ६९९ रूपयांचे आढळून आले. दरम्यान, ह्याच पथकाने चिखलवर्धा ते सावळी रस्त्यावरील एका शेडमध्ये दवाखान्याचे बोर्ड लावलेल्या अवस्थेत दिसून आले, परंतू तो दवाखाना बंद होता. त्याच्या शेजारील सम्राट सोपान अधिकारी वय ३२ वर्ष, रा. चिखलवर्धा यांच्या घराची झडती आशा वर्कर निता कन्नाके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. घराच्या किचनमध्ये मोठ्या प्रमाणात एलोपथी औषधी, गोळ्या, अंदाजे ३२ हजार रूपयांच्या आढळून आल्या. हे तिघेही अनधिकृतरीत्या वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आले.
औषधींसह इतर वस्तू जप्त
तिन्ही बोगस डॉक्टरांनी थाटलेल्या दवाखान्यात औषधींसह विविध वैद्यकीय साहित्य, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने ३३ हजार ३५६ रूपयांचे औषध आढळून आली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेले संपूर्ण औषधी ही खासगी कंपनीची असल्याची माहिती आहे.
ह्या चार परिषदांकडे नोंदणी आवश्यक
कुठल्याही वैद्यकीय अधिकाऱ्यांना महाराष्ट्र वैद्यक सेवा अधिनियम १९६१ मधील कलम ३३ अन्वये संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी करून घेणे आवश्यक आहे. यात प्रामुख्याने महाराष्ट्र वैद्यक परिषद, महाराष्ट्र समचिकित्सा परिषद, महाराष्ट्र भारतीय चिकित्सा परिषद, महाराष्ट्र दंतवैद्य परिषद या चार परिषदेकडे नोंदणी आवश्यक आहे.
वरिष्ठांच्या आदेशावरून रुग्णालयाची तपासणी
ग्रामीण भागातील नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही बोगस व्यक्तींनी दवाखाने चालू केले आहे. त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची औषधी, सलाईन लावुन उपचार करीत आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले होते. या आदेशान्वये तपासणी करून कारवाई केली.
डॉ. धर्मेश चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी, घाटंजी.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.