आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रसंतांना व राष्ट्रपित्याला अभिप्रेत असलेला धर्म हा आजच्या तथाकथित साधू संत मानतात का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. आजच्या तरुणांना राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता समजायचा असेल, तर साहित्य आणि त्यांच्या विचार आत्मसात करायला पाहिजे. राष्ट्रसंताचा धर्म होता सर्वधर्माचा समन्वय, विश्वशांतीचा उपाय, लोकसुधारणेचे विद्यालय, हा सर्वधर्मांना घेऊन चालणारा आणि सर्वधर्मांचा सन्मान करणारा धर्म हा राष्ट्रसंतांना अभिप्रेत असल्याचे मत संभाजी ब्रिगेड प्रवक्ते तथा प्रमुख वक्ते प्रेमकुमार बोके यांनी व्यक्त केले. तसेच जोपर्यंत इतर धर्मांबद्दल आदर करणार नाही तोपर्यंत राष्ट्रपित्याला आणि राष्ट्रसंतांना अभिप्रेत असलेला देश आम्ही घडू शकणार नाही, असे प्रतिपादनही यावेळी प्रमुख वक्ते बोके यांनी केले.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशाने राष्ट्रधर्म युवा मंच जिल्ह्याच्या वतीने पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन शहरातील अभियंता भवन येथे पार पडले. दोन दिवसीय संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर हे होते, तर डॉ. सुभाष सावरकर यांच्या हस्ते उद्घाटन शनिवारी झाले.
पहिल्या दिवशी संमेलनात हरिभाऊ वेरूळकर यांची प्रकट मुलाखात, भजन संगीत मैफल तसेच कविसंमेलन पार पडले. तर रविवारी राज्यस्तरीय निबंध, चित्रकला व रांगाेळी स्पर्धा पार पडली. यानंतर विविध विषयांवर परिसंवाद कार्यक्रम पार पडले. यामध्ये ‘राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता यांच्या विचारातील समन्वय’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रवीण देशमुख म्हणाले, सध्या देशात राष्ट्रपितांवर मोठ्या प्रमाणावर टीका करणारी युवा मंडळी दिसून येत असून ही देशातील सर्वांत मोठी शोकांतिका असून याचे चिंतन होणे गरजेचे आहे. राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता या दोघांचे एक वैचारिक नाते होते. दोघांचेही विचार हे मानव हिताचे असल्याचे त्यांनी मांडले. मराठा सेवा संघ प्रवक्ता प्रवीण देशमुख म्हणाले की, राष्ट्रसंत आणि राष्ट्रपिता यांचे विचार हे मानव कल्याण करणारे विचार आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार संपूर्ण विश्वाने स्वीकारले असल्याचे देशमुख म्हणाले. परिसंवादानंतर संमेलनाचा समारोप पार पडला. या वेळी आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विनायक सवाई यांना ग्रामगीता जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच युवराज आढाव यांना विशेष कार्यकर्ता या पुरस्काराने गौरवण्यात आले, तर सप्तखंजिरी वादक प्रबोधन कार्यक्रमाने साहित्य संमेलनाचा समारोप झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.