आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोमेट्रिक:बंद बायोमेट्रिक मशीन पुन्हा चालू करा ; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले निर्देश, 9 मशीन लावणार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद इमारतीसह यवतमाळ पंचायत समितीतील बायोमेट्रिक गेल्या काही महिन्यापासून बंदच आहेत. परिणामी, कर्मचारी मनमानीपणाने कार्यालयात ये-जा करीत आहे. याची भनक लागताच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी बंद असलेल्या सर्वच बायोमेट्रिक मशीन पुन्हा चालू करावेत, असे निर्देश दिले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या हजेरीचे बायोमेट्रिक मशीन बंद कराव्यात, असे निर्देश शासनाने दिले होते. निर्देशानंतर जि. प. च्या इमारतीतील मशीन बंद करण्यात आल्या होत्या, परंतु कोविडचे निर्बंध उठल्यानंतर सर्वत्र पुन्हा बायोमेट्रिक मशीन चालू करण्यात आल्या. मात्र, यवतमाळ जि. प. तील संपूर्ण मशीन बंदच होत्या. त्यामुळे कर्मचारी मनमानीपणाने कार्यालयात येत होते. कामांचा खोळंबा मोठ्या प्रमाणात उडत. मध्यंतरी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कृषी, बांधकाम विभाग क्रमांक एक, आरोग्य, पशु संवर्धन विभागात प्रत्यक्ष भेट दिली. त्यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी गैरहजर आढळून आले होते. गैरहजर कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तरीसुद्धा कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत हजर राहणे चालूच केले नाही. शेवटी संतप्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनी जि. प. तील सर्वच कार्यालयातील व पंचायत समितीतील बायोमेट्रिक मशीन चालू करण्याबाबतचे निर्देश दिले आहे. विशेष म्हणजे अधिकाऱ्यांना सुद्धा बायोमेट्रिक अनिवार्य केल्या जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. यात प्रामुख्याने जिल्हा परिषद इमारतीत चार, कृषी, बांधकाम क्रमांक एक, आरोग्य, पशू संवर्धन आणि माध्यमिक शिक्षण विभाग, अशा मिळून ९ मशीन बसविण्यात येणार आहे. मशीन लावलेल्या ठिकाणी कॅमेरेसुद्धा बसविण्यात येणार आहे.

बातम्या आणखी आहेत...