आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक:भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; कळंब शहरातील पेट्रोलपंपाजवळील घटना

कळंब18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव चारचाकी बेलोरा वाहनाने दिलेल्या धडकेत एका आश्रम शाळेत काम करणाऱ्या दुचाकीस्वार स्वयंपाकीचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. ही घटना कळंब ते यवतमाळ मार्गावर असलेल्या एका पेट्रोलपंपाजवळ रविवार, दि. १ मे ला रात्रीच्या ८ वाजताच्या सुमारास घडली. जानराव रामाजी आत्राम वय ४९ वर्ष रा. आवळगाव ता. मारेगाव ह. मु. शर्मा ले-आऊट रासारोड कळंब, असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील माजी मंत्री वसंतराव पुरके यांच्या जीवनदीप आश्रम शाळेवर स्वयंपाकी पदावर कार्यरत असलेले कर्मचारी जानराव आत्राम गेल्या २२ वर्षापासून जीवनदीप आश्रम शाळेवर स्वयंपाकी पदावर कार्यरत आहे. दि. १ मे ला जानराव आत्राम जीवनदीप आश्रम शाळेकडून घराकडे रात्री परत येत दुचाकी क्रमांक एमएच-२९-एसी-९०९८ ने जात होते. अश्यात कळंब येथील साईबाबा पेट्रोल पंपासमोर भरधाव बोलेरो वाहनाने आत्राम यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

दरम्यान भरधाव बोलेरो यवतमाळच्या दिशेने निघून गेली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या कर्मचारी जानराव आत्राम कळंब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने यवतमाळ येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी जानराव आत्राम यांना मृत घोषित केले. दि. २ मेला उत्तरीय तपासणीनंतर त्यांच्यावर आवळगाव येथील राहत्या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

याप्रसंगी जीवनदीप आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत चिंचुलकर यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. मृतकाचे मागे, पत्नी, १ मुलगा, १ मुलगी, असा बराच मोठा आप्त परिवार आहे. या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात त्या बोलेरो वाहन चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...