आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणंद रस्ता खोदला:ले-आऊट डेव्हलपमेंटच्या आडोशाने गौणखनिजाचे विना परवानगी उत्खनन

यवतमाळ14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहराच्या चारही बाजूला नवनवे ले-आऊट तयार करण्याचा सपाटा सध्या व्यावसायिकांनी सुरू केला आहे. मात्र या ले-आऊट डेव्हलपमेंटच्या आडोशात विना परवानगी गौणखनिजांचे उत्खनन करण्याचा सपाटा काही ले-आऊटधारकांकडुन सुरू करण्यात आला आहे. गोधनी कोठा परिसरात तर अख्खा पाणंद रस्ता चक्क ४ फुट खोदून त्यावरील मुरूम गायब करण्यात आला आहे. असचे काहीसे प्रकार इतर परिसरातही सुरू असल्याची ओरड आता सुरू आहे.

यवतमाळ नगर पालिकेची हद्द वाढ होवून शहरालगत असलेल्या वडगावरोड, लोहारा, वाघापूर, पिंपळगाव, मोहा, भोसा आणि उमरसरा या सात ग्रामपंचायती नगर पालिकेत विलीन करण्यात आल्या. त्यानंतर आता शहराचा आनखी झपाट्याने विस्तार होत आहे. शहराच्या अंतर्गत भागांमध्ये भूखंड कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने नागरिक आता शहरापासून जवळ असलेल्या परिसरामध्ये भूखंड खरेदीसाठी प्रयत्न करीत आहेत. नेमकी ही बाब लक्षात घेता काही व्यावसायिकांनी आणि डेव्हलपर्स यांनी शहराभोवती असलेल्या शेत जमिनीचे रुपांतर ले-आऊटमध्ये करण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे सध्या अशा नवनव्या ले-आऊटचे पीक सध्या शहरात आले आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ले-आऊटमध्ये रस्ते, नाल्या, स्ट्रीट लाइट लावण्यात येत आहे. चढ-उतार किंवा ओबड-धोबड असलेल्या जमिनीचे सपाटीकरण त्यासाठी करण्यात येत आहे. ही सर्व कामे करण्यात येत असताना काही लेआऊट धारकांनी मात्र लेआऊट च्या आजुबाजुला अवैधरीत्या उत्खनन करण्याचा सपाटा सुरू केला आहे. या उत्खननामधुन निघालेल्या गौणखनिजांचा वापर ले-आऊटमध्ये करण्यात येत आहे. त्यांच्याकडुन करण्यात येत असलेल्या या नियमबाह्य कामासंदर्भात नागरिकांची ओरड आता सुरू झाली आहे.

लेआटमध्ये सपाटीकरण करणे, किंवा लेआऊट मध्ये एका ठिकाणचे गौनखनिज त्याच लेआऊट मध्ये वापरणे यासाठी परवानगीची आवश्यकता नसते. मात्र काही ले-आऊट धारकांनी त्यांच्या ले-आऊटच्या शेजारी असलेल्या पाणंद रस्त्यावर चक्क चार फुट खोलीपर्यंत उत्खनन केलेले दिसत आहे. या रस्त्यावरुन उत्खनन केलेल्या मुरूमची परस्पर विल्हेवाट लावण्यात आली आहे.

आकर्षित करण्यासाठी नवनवीन योजना
शहराभोवती तयार होणाऱ्या नव्या ले-आऊटमधील भूखंडांची विक्री करताना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवण्यात येत आहे. मात्र या योजनांच्या माध्यमातून काही ग्राहकांची फसवणूक झाल्याची चर्चा रंगत आहे. इतकेच नव्हे तर योजनांच्या नावाखाली अविकसित ले-आऊटमधील भूखंड ग्राहकांच्या माथी मारण्याची शक्यता असते. त्यामुळे ग्राहकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

शहरात विविध भागात ले-आऊटला जोडणारे रस्ते जैसे थे
शहरात विविध भागात एका शेजारी एक असे नवनवे ले-आऊट तयार होत आहे. त्यातील काही ले-आऊट चांगल्या पद्धतीने डेव्हलप ही करण्यात येत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सीमेंट-काँक्रीटचे रस्ते, पुल तयार करण्यात येत आहे. मात्र या ले-आऊटपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली दिसत आहे. त्यासंदर्भात संबंधीत ले-आऊट धारकांकडून कुठलीही उपाययोजना होत नाही हे विशेष.

या संदर्भात लवकरच तपासणी होणार
एखाद्या ले-आऊटधारकाला त्याच्या ले-आऊटमध्ये सपाटीकरण करण्यासाठी किंवा एका भागातले गौनखनिज दुसऱ्या भागात सपाटीकरणासाठी त्यांना वेगळी परवानगी घेण्याची गरज नाही. मात्र कुणा कडुन पाणंद रस्ता खोदण्यासारखा प्रकार करण्यात आला असेल तर त्या ठिकाणी पाहणी करुन संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल. शहरासभोवतीच्या ले-आऊटचीही लवकरच तपासणी करु.-कुणाल झाल्टे, तहसीलदार, यवतमाळ

ले-आऊट तपासणीकडे होतेय दुर्लक्ष
नगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या परिसरात ले-आऊट पुर्ण डेव्हलप झाल्याशिवाय त्यांच्या विक्रीची परवानगी देण्यात येत नाही. त्याऊलट शहराच्या हद्दीला लागुन असलेल्या ग्रामपंचायत परिसरात या बाबीकडे दुर्लक्ष होते. त्याचा फायदा घेत अविकसित ले-आऊटची धडाक्याने विक्री करण्यात येते. मात्र कालांतराने त्याचा भुर्दंड भूखंड खरेदी करणाऱ्या ग्राहकांना बसुन त्यांना मोठा डेव्हलपमेंट चार्ज भरणा करण्याची वेळ येते.

बातम्या आणखी आहेत...