आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:पाच ग्रामपंचायतींच्या सरपंचांसह 127 सदस्यांची बिनविरोध निवड

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील १०० ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्य पदाकरीता होणाऱ्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या जिल्ह्यात सुरू आहे. त्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुक होत असलेल्या १०० सरपंचांपैकी पाच सरपंच आणि ७७६ सदस्यांपैकी तब्बल १२७ सदस्य बिनविरोध विजयी झाले. त्यानंतर आता उर्वरीत जागांसाठी अद्याप १७०३ इच्छुक निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत.

जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीमधील १०० सरपंच पदासाठी आणि ३०८ प्रभागातील ७७६ सदस्य पदासाठी ही निवडणूक होवू घातली आहे. येत्या १८ डिसेंबर रोजी मत मोजणीची प्रक्रीया पार पडणार आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचा निर्धार करुन सरपंच पदासाठी ३८७ तर सदस्य पदासाठी तब्बल १७१२ इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी सरपंच पदाचे ६ आणि सदस्य पदासाठीचे १९ अर्ज अवैध ठरले होते. यानंतर उरलेल्या वैध नामांकन अर्जापैकी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सरपंच पदासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी ८३ इच्छुक आणि सदस्य पदासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी १५६ इच्छुकांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. याचा फायदा होत सरपंच पदासाठी अर्ज करणारे पाच जण आणि सदस्य पदासाठी अर्ज करणारे १२७ जण अविरोध विजयी झाले. त्यामुळे आता निवडणुकीच्या रिंगणात ९५ सरपंच पदासाठी २९३ आणि सदस्य पदाच्या ६४९ पदासाठी १४१० इच्छुक निवडणूक रिंगणात शिल्लक आहेत.

जिल्ह्यातील शंभर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आता अवघ्या दहा दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. त्यातच सर्व पक्षांनी या निवडणुकीत रस दाखवला असल्याने या निवडणुका चांगल्याच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत. त्यातही यंदा सरपंच पदाची निवड थेट मतदारांमधून होणार आहे. त्यामुळे निवडणुकीत उमेदवारांमध्ये चांगलीच चुरस पहावयास मिळणार आहे. अशा परिस्थितीत निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी चांगलीच कंबर कसली आहे.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक सर्वच राजकीय पक्षासाठी सराव परीक्षाच ठरणार आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. आता निवडणूक चिन्ह वाटप झाल्यामुळे शिल्लक असलेल्या १० दिवसात उमेदवारांना प्रचारासाठी प्रचंड घाम गाळावा लागणार आहे. या प्रचारात मतदार कुठल्या उमेदवाराला पसंती देणार हे सोमवार, दि. १९ डिसेंबर रोजी मतमोजणीच्या वेळीच स्पष्ट होईल.

बातम्या आणखी आहेत...