आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपुष्टात:लिलाव झालेल्या सर्व 25 रेती घाटांतील उपसा बंद; ताबा परत घेण्याचे दिले निर्देश

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात चालु वर्षात लिलाव करण्यात आलेल्या सर्व रेतीघाटांमधुन रेतीचा उपसा करण्यासाठी देण्यात आलेली मुदत ९ जुन रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे शुक्रवार दि. १० जुन पासुन या सर्व लिलाव करण्यात आलेल्या रेतीघाटांमधुन सुरू असलेला रेतीचा उपसा बंद करण्यात आला आहे. त्यासंदर्भात जिल्हा खनिकर्म विभागाने सर्व तहसीलदार यांना पत्र देवुन उपसा बंद ठेवुन रेती घाटांचा ताबा परत घेण्याचे निर्देश दिले आहेत.

जिल्ह्यात यंदा २५ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला होता. या लिलावाच्या माध्यमातुन जिल्ह्याच्या तिजोरीत १६ कोटी ७० लाख रुपयांचा महसुल गोळा झाला आहे. या दरम्यान शासनाने रेती सुधारीत धोरण २८ जानेवारी २०२२ रोजी जाहीर केले आहे. त्यानुसासार राज्यभरात रेतीघाटातुन रेतीचा उपसा करण्यासंदर्भात ही सुधारीत कार्यपद्धती अवलंबण्यासाठी नव्याने मार्गदर्शक तत्वे विहित केली आहेत. त्यानुसार रेती घाट लिलाव करताना त्या लिलावांचा कालावधी पावसाळ्याच्या ४ महिन्यांच्या कालावधीसह समाविष्ट करण्यात आला आहे. १० जुन ते ३० सप्टेंबर हा पावसाळ्याचा कालावधी ठरविण्यात आला असुन या कालावधीत रेतीघाटधारकांना रेतीघाटामधुन रेतीचे उत्खनन करता येणार नाही, असे नव्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

दरम्यान या नव्या निर्देशानुसार १० जुन पासुन पावसाळ्याचा कालावधी सुरू होत असल्याने ९ जुन रोजी रेती घाटांचा रेती उपसा करण्याचा कालावधी संपला आहे. त्यामुळे जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी ज्या तालुक्यातील रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे अशा सर्व तहसीलदार यांना पत्र पाठवून जिल्ह्यातील लिलाव झालेल्या रेतीघाटांमधुन सुरू असलेला रेतीचा उपसा बंद करण्यात यावा असे निर्देश दिले आहेत.

याशीवाय रेती घाट बंद केल्यानंतर त्या ठिकाणांवरुन उपसा होणार नाही किंवा कुठल्याही रेतीघाटामधुन रेतीची तस्करी होणार नाही यावर लक्ष ठेवुन योग्य कारवाई करण्याच्या सुचना देण्या आल्या आहेत. याशीवाय लिलाव झालेल्या आणि लिलाव न झालेल्या रेतीघाटांमधुन कुठल्याही प्रकारे अवैध रेती उत्खनन होणार नाही यासंदर्भात सक्तीने कारवाई करावी आणि त्यासाठी विशेष पथकांचे गठण करावे अशा सूचनाही सर्व तहसील कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. आता रेती घाट बंद झाल्याने केवळ साठवणूक केलेल्या रेतीसाठ्यामधुन रेतीची विक्री करावी लागणार आहे. त्यामुळे आता महसुल विभागाला या रेती विक्रीवरही लक्ष ठेवावे लागणार आहे.

९ जणांना साठ्याची परवानगी, ४ प्रकरणे प्रलंबित
रेतीघाटांमधुन रेतीचा उपसा करण्यास पावसाळ्यात ४ महिने बंदी आहे. मात्र घाट सुरू असल्याच्या दरम्यान रेतीघाटधारकांनी रेतीचा उपसा करुन त्याचा साठा केला असेल तर त्यातुन रेतीची विक्री करता येणार आहे. मात्र त्यासाठी जिल्हा खनिकर्म विभागाची रेती साठा करण्याची परवानगी असणे आवश्यक आहे. आतापर्यंत अशा ९ जणांनी रेतीसाठ्याची परवानगी घेतली असुन आणखी ४ प्रकरणे प्रलंबित आहे.

त्या प्रकरणाच्या चौकशीकडे लक्ष
रेतीघाटधारकांकडुन सुरू असलेल्या अनियमिततेच्या तक्रारीवरून मध्यंतरीच्या काळात सहा रेतीघाटांवर अचानक धडक देत जप्तीची कारवाई करण्यात आली होती. त्या प्रकरणात संबंधीत रेतीघाटधारकांना नोटीस बजावून त्यांची पेशी अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे घेण्यात आली. मात्र अद्याप काही रेतीघाटधारक हजर झाले नसल्याने आता या प्रकरणांमध्ये महसुल विभागाच्या वतीने काय कारवाई करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अवैध उपशावर लक्ष
लिलाव झालेल्या रेतीघाटांमधुन रेतीचा उपसा बंद झाल्याने रेती तस्करांना आता रान मोकळे होणार आहे. लिलाव न झालेल्या आणि लिलाव झालेल्या अशा दोन्ही पद्धतीच्या रेतीघाटांमधुन रेतीची तस्करी सुरू होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आता रेतीच्या या अवैध उपश्यावर महसुल विभागाच्या वतीने विशेष लक्ष ठेवणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

मोजमाप करुन ताबा
रेतीघाटांवरील रेतीचा उपसा १० जूनपासून बंद करण्यात आला आहे. या सर्व रेती घाट धारकांना तहसीलदारांच्या माध्यमातुन रेती घाटांचा ताबा देण्यात आला होता. त्यामुळे आता या सर्व २५ रेती घाटांचा ताबा रेती घाटातील रेतीसाठ्याची मोजमाप करुन तातडीने परत घेण्याच्या सुचना तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...