आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:विदर्भात लवकरच राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धा; राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खा. तडस यांचे आश्वासन

सुरेंद्र मिश्रा | दिग्रस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्षपद सध्या विदर्भाकडे आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघाचे भाजप खासदार रामदास तडस सध्या या परिषदेचे अध्यक्ष आहेत. पहिल्यांदाच हा बहुमान विदर्भाला मिळाला आहे. नुकतेच त्यांनी दिग्रस येथे भेट दिली. या प्रसंगी दिव्य मराठीने त्यांच्याशी साधलेल्या संवादाचा सारांश.

महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष खासदार रामदास तडस दिग्रस आणि विदर्भाच्या भागात कुस्तीला चालना देण्यासाठी काय योजना राबवतील असे विचारले असता त्यांनी सांगितले की, विदर्भाच्या मातीत उत्कृष्ट खेळाडू घडले आहेत. त्यातही विशेष करून दिग्रसमध्ये तर कबड्डी सारख्या राकट खेळाला आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजवण्याची कामगिरी येथील खेळाडूंनी केली आहे. त्यामुळे कुस्तीला या मातीत चांगली भरारी घेता येईल. या संदर्भात दिग्रस येथे विदर्भ स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन लवकरच आम्ही करू. या बाबत विदर्भ विभागीय कुस्तीगीर संघटनेकडे तसा प्रस्ताव दिग्रसमधून यावा. नक्कीच आम्ही या स्पर्धा येथे घेऊ शिवाय विदर्भात राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पुरुषांच्या आणि महिलांच्या कुस्ती स्पर्धाही लवकरच घेऊ, असे ही त्यांनी सांगितले.

विविध पातळीवर विविध क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंनी चांगलेच मैदान गाजवले आहे. अशा खेळाडूंसाठी सरकारी सुविधा आणि विशेष सवलती असतात परंतु त्या खेळाडूंना मिळण्यास विलंब होतो. याकरिता काय कराल असे विचारले असता त्यांनी सांगितले की, पूर्वी क्रीडा क्षेत्रात खूप अडचणी होत्या. विशेष करून महाराष्ट्र आणि पंजाब हरियाणाच्या क्रीडा धोरणामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. पंजाब आणि हरियाणामध्ये जर एखादा खेळाडू राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा राष्ट्रकूलमध्ये खेळून आला तर त्याला सरळ डीवायएसपी पदावर नियुक्ती मिळते. परंतु महाराष्ट्रात असे काहीही नव्हते. परंतु २०१४ मध्ये जेव्हा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नागपूर येथे अधिवेशन झाले तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष या संदर्भात मी प्रस्ताव मांडला. त्याला तत्कालीन मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत गंभीरतेने घेतलं आणि त्यांनी तसा दिलेला शब्दही पाळला. तेव्हापासूनच आता महाराष्ट्रामध्ये हिंद केसरी महाराष्ट्र केसरी या खेळाडूंना डीवायएसपी पदावर नियुक्ती देण्यात आलेली आहे.

सध्या आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या समक्ष प्रस्ताव मांडलेला आहे की, ज्याप्रमाणे केंद्र सरकारने सर्व खेळासाठी समिती नेमली आहे आणि त्या समितीच्या अध्यक्षाला मंत्र्याचा दर्जा दिलेला आहे. या समितीत १७ सदस्य आहेत. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही समितीचे गठन करण्यात यावे. यामुळे सर्व खेळाला राजाश्रय मिळेल. या समितीचा असा फायदा आहे की, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी क्रीडा क्षेत्राकडे विशेष लक्ष दिले. हेच कारण आहे की, आपण नुकत्याच झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत नेत्रदीपक यश मिळवले आहे. हे फक्त भाजप सरकारच्या कारकिर्दीत शक्य झाले. त्या आधीच्या काँग्रेस राजवटीत मात्र नेत्यांनी आपले कारखाने आणि शैक्षणिक संस्था उभारल्या. भाजप सरकार याकडे विशेष लक्ष देत आहे. निश्चितच क्रीडा क्षेत्राला यातून मजबूती मिळेल, असे खा. तडस म्हणाले.

भाजपच्या कारकीर्दीमध्येच विदर्भाची निर्मिती होईल
खा. रामदास तडस यांना विदर्भ राज्य निर्मिती बद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, भारतीय जनता पक्षाचे सरकार नेहमीच छोट्या राज्याच्या निर्मितीचे समर्थन करते. विदर्भ राज्य निर्मिती बाबतही विषय सरकारच्या विचाराधीन आहे. नक्कीच भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कारकीर्दीमध्ये विदर्भाची निर्मिती होईल, असेही या वेळेस खासदार रामदास तडस यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...