आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:ग्राम संस्कृती चिरंतन आणि प्रेरणादायी ; डॉ. मोना चिमोटे यांचे प्रतिपादन

मारेगाव20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज जग आधुनिकतेची कास धरत आहे, असे दिसत असताना ग्रामीण संस्कृतीत रुजलेली आणि संस्कृतीची महत्तम पातळी जगाला शिकवणारी ग्रामसंस्कृती आजही आपले चिरंतन स्वरूप अबाधीत ठेवून आहे. ग्राम संस्कृतीच्या या जीवनदायी मूल्यानेच समाज मनाला प्रेरित केलेले आहे आणि स्वतःचे स्वरूप प्रेरणादायी म्हणून निर्माण केलेले आहे, यामुळे आपणास या ग्राम संस्कृतीचे पावित्र्य जपायचे आहे, असे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. मोना चिमोटे यांनी केले.

मारेगाव येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात आयोजित मराठी वाङ्मय मंडळाच्या उद््घाटक म्हणून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे आयोजित मराठी वाङ्मय मंडळ उद््घाटनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश घरडे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाच्या अध्यक्ष डॉ. ममता इंगोले उपस्थित होत्या. कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित असलेल्या महिलांचा कौतुकास्पद उल्लेख करुन मनोगत व्यक्त करताना त्या म्हणाल्या, आज येथे स्त्री शक्तीचा महाविद्यालयाने सन्मानच केला असून स्त्री शक्तीने केवळ ग्रामीण संस्कृतीच नाही तर एकूणच संस्कृतीची निर्मिती केली आहे.

या संस्कृतीला जिवंत ठेवण्याचे जबाबदारीचे काम आजचा स्त्रीवर्ग आपणास करताना दिसतो. कोरोनासारखी अनेक संकटे सहन करणारी स्त्री शक्ती निश्चितच प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. आपल्या अध्यक्षीय भाषणातून मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांनी ग्रामीण संस्कृती व्यक्त करणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजींच्या विचारमालेचा येथे गौरवोल्लेखही केला. आपण विज्ञानाच्या आधारे कितीही प्रगती केली असली तरी ग्रामगीता ही आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून महाविद्यालयातील मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. राजेश चवरे यांनी कार्यक्रमाची भूमिका आणि ग्रामसंस्कृती या विषयाची मांडणी केली. कार्यक्रमाचे संचालन डॉ. प्रवीण कुलकर्णी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. गजानन सोडनर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांसह प्रा. बाळासाहेब देशमुख, प्रा. डॉ. विभा घोडखांदे, प्रा. स्नेहल भांदककर, प्रा. माधुरी शेंडे यांनी सहकार्य केले.

बातम्या आणखी आहेत...