आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिकीकरणाच्या वर्तमान युगातील स्पर्धेत टिकून राहण्यासाठी उच्च दर्जाचे ज्ञान व तंत्रज्ञान विकसित करणे आवश्यक असून, त्यासाठी नवनवीन कौशल्याधिष्ठित शिक्षण व प्रशिक्षण घेणे काळाची गरज आहे. तेव्हा राष्ट्रीय स्तरावर राबवल्या जाणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने विद्यार्थ्यांनी स्वीकारली तरच स्पर्धेत टिकाव लागेल असे आवाहन शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरचे उपकुलसचिव डॉ. विलास सोयाम यांनी केले. ते आर्णी येथील स्व. राजकमल भारती कला, वाणिज्य महाविद्यालयातील वाणिज्य व अर्थशास्त्र विभागाद्वारे आयोजित रिसेंट रिफॉर्मस् इन हायर एज्युकेशन या विषयावरील कार्यशाळेत बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निवृत्ती पिस्तुलकर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपकुलसचिव डॉ. विलास सोयाम व प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक डॉ. शशिकांत वानखडे, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. विनीत माहूरे, कला शाखा प्रमुख प्रा. सदानंद बोळे, विज्ञान शाखा प्रमुख डॉ. मनोज काकपुरे विचार पीठावर उपस्थित होते. डॉ. सोयाम यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, ज्या महाविद्यालयातून मी वाणिज्य शाखेची पदवी घेवून कोल्हापूर विद्यापीठात उपकुलसचिव यासारखे सन्मानाचे पद प्राप्त केले. त्याच माझ्या महाविद्यालयात माझा सत्कार करून कार्यशाळेत उद्बोधन करण्याची संधी मिळाली मी स्वतःला भाग्यशाली मानतो.
बांधकामावर मोलमजुरी करणाऱ्या माझ्यासारख्या एका गरीब विद्यार्थ्याच्या पंखात उंच भरारी मारण्याचे बळ देणाऱ्या या सर्व गुरु जनांचा मी ऋणी आहे. ज्या महाविद्यालयाने मला घडवलं त्या महाविद्यालयातील पुढच्या पिढीने देखिल यशाची नवनवी शिखरे पादाक्रांत करावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे असे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी काळाची पावले ओळखून स्पर्धेत टिकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी. निर्धारीत लक्ष्ये गाठण्यासाठी प्रचंड मेहनत, चिकाटी आणि सातत्य आवश्यक असल्याचे आवाहन डॉ सोयाम यांनी केले. परंतू ध्येयापासून विचलित करणारे अनेक घटक समाजात सक्रीय असतात जे युवकांना आकर्षित करतात. यापासून युवकांनी नेहमी सावध झालं पाहिजे.
आपल्यातील कौशल्य विकासासोबतच एक संवेदनशील माणूस म्हणून देखिल ओळख निर्माण करता आली पाहिजे. असे त्यांनी मोलाचे मार्गदर्शन त्यांनी या प्रसंगी केले. डॉ. सोयाम यांनी यावेळी खारीचा वाटा म्हणून या वर्षापासून वाणिज्य शाखेतून प्रथम येणाऱ्यास १० हजार रूपये शिष्यवृत्ती देण्याचे जाहीर केले. प्राचार्य निवृत्ती पिस्तुलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात उपकुलसचिव डॉ. विलास सोयाम यशामुळे केवळ त्यांच्या परिवाराचेच नाव मोठे झाले नसून आपल्या महाविद्यालयाच्या व आर्णीच्याही लौकिकात भर पडली आहे.
सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या पावलावर पाऊल टाकून यशाचं शिखर गाठलं पाहिजे. त्यांनी सुरू केलेली ही दहा हजार रुपयाची शिष्यवृत्ती एक मैलाचा दगड ठरणार आहे. त्यामूळे त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.मिलिंद पांडे तर डॉ. विनीत माहुरे यांनी आभार व्यक्त केले. या कार्यशाळेला कला व वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शेवटी प्रश्नोत्तराच्या सत्रात उपकुलसचिव विलास सोयाम यांनी विद्यार्थ्याच्या अनेक समस्या जाणून घेतल्या व विचारलेल्या विविध प्रश्नांची सकारात्मक उत्तरे देवून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.