आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाशीम जिल्ह्याला जोडणारा शिरपूर करंजी, ब्राह्मणवाडा, तामसी, सोनखास या रस्त्याची अवस्था ‘रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते’ अशी झाली आहे. रस्त्यावरील छोटे पूल पावसाने खचून गेलेले आहेत. मागील दोन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग विकास महामंडळ ६ कोटी २५ लाख व राज्य अर्थसंकल्पामध्ये ३ कोटी मिळून सवा नऊ कोटींचा निधी मंजूर होऊन निविदाही निघाल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांचे उदासीन धोरण व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्षामुळे अजूनही काम सुरू झाले नाही. रिठद, करंजी, शेलगाव, मुठा, दापुरी, शिरसाळा, वाघळूद वाकद या रस्त्याची सुद्धा अवस्था खराब झाली आहे. नुकतेच अमानी ते करंजी या रस्त्याची थातूरमातूर डागडुजी करून उर्वरित रस्ता तसाच सोडून दिला आहे. वाशीम ते शिरपूर वाया करंजी, अमानी, रिठद, मसला, तपोवन सर्कलच्या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधी तसेच बांधकाम विभागाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
परिसरातील जवळपास १०० गावातील ग्रामस्थ या मार्गाने प्रवास करतात. मोठी वाहने तर सोडा मोटरसायकल चालवणेही या रस्त्याने कठीण आहे. कित्येक वर्षापासून या रस्त्याची दुर्दशा कायम अशीच आहे. वाशीमला जाणारा हा जवळचा रस्ता असल्यामुळे या मार्गाने नेहमीच वर्दळ असते. शेतकऱ्यांना शेतमाल नेण्याच्या दृष्टीने हा मार्ग जवळचा आहे. तसेच परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी हाच रस्ता महत्त्वाचा रस्ता आहे. परंतु, या रस्त्याची झालेली दुर्दशा पाहून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. एखाद्या रुग्णाला वाशीमला रुग्णालयात न्यायचे असल्यास जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. जिल्हा विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला शिरपूर जैन हे जैनांची काशी जानगीर महाराज संस्थान तसेच परिसरातील छोट्या उद्योगधंद्याचे प्रमुख बाजारपेठ आहे.
या रस्त्याच्या झालेल्या दुर्दशेमुळे पायी चालणेही कठीण होते. मालेगाव तालुक्यातील सर्वात मोठा मार्ग असून १०० गावांना जोडणारा रस्ता आहे. या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.