आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून खून:चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या; 7 दिवसांतील दुसरी घटना

आर्णी12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

चारित्र्यावर संशय घेवून पतीने चक्क पत्नीची गळा आवळून हत्या केली. ही घटना सोमवार, दि. १ ऑगस्टला सकाळच्या सुमारास आर्णी तालुक्यातील सुकळी येथे उघडकीस आली. सविता विनोद कथलेवाड वय २६ वर्ष रा. सुकळी ता.आर्णी असे मृत महिलेचे नाव असून मारेकरी पती विनोद चंद्रभान कथलेवाड वय ३४ वर्ष याने थेट पोलिस ठाणे गाठून पत्नीची हत्या केल्याची कबूली पोलिसांसमोर दिली.दरम्यान दि. २४ जुलैला नेर तालुक्यातील खोलापूरी ते डोमगा मार्गावर सकाळी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीवर कुऱ्हाडीने वार करीत तिची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर सात दिवसांनी आर्णी तालुक्यातील सुकळी येथे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या करण्यात आली.

सात दिवसात अनैतिक संबंधाच्या संशयावरून दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, आर्णी तालुक्यातील सुकळी येथील सविता हिचा सन २०१४ मध्ये कवठा बाजार येथील विनोद कथलेवाड याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर सविता ही सासरी कवठा बाजार येथे नांदायला गेली. विनोद याच्यापासून सविता हिला दोन मुली असून एक मुलगी ७ वर्षाची तर दुसरी मुलगी ५ वर्षाची आहे. सविता व विनोद दोघेही पती-पत्नी एकमेकांसोबत चांगले नांदत होते. अशात सन २०२१ मध्ये विनोद हा सविता हिच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला त्रास देत होता. ही बाब सविता हिने तिच्या माहेरच्यांना सांगितली होती. त्यानंतर विनोद याला माहेर कडील मंडळींनी समजावून सांगितले होते.

मात्र त्याच्या मनातून संशय जात नव्हता. दरम्यान सन २०२२ मध्ये विनोद हा सासरी सुकळी येथे सविता आणि दोन मुलींना घेवून आला. यावेळी सविता हिचे वागणे बरोबर दिसत नसल्याने तिला तुमच्याकडे राहू द्या, असे म्हणून विनोद निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी विनोद याने सुकळी येथे येणे जाणे चालु झाले. महिन्याभरानंतर विनोद हा कवठाबाजार येथून त्याचा पसारा येथून सुकळी येथे आला आणि सासऱ्याकडेच पत्नीसोबत राहु लागला. दरम्यान सासऱ्याने गावातील महादेव मुंगेवाड यांच्या खुल्या प्लॉटमध्ये टिनाची एक खोली जावाई विनोद याला राहायला बांधून दिली. त्यानंतर विनोद आणि सविता चांगले राहात होते. एक महिन्यापूर्वी विनोद याने आंघोळी करीता कपडे का आणून दिले नाही, म्हणून वाद निर्माण करीत तिच्या चारित्र्यावर संशय घेतला होता. तसेच एखाद्या दिवशी जिवाने मारून टाकण्याची धमकी दिली.

मारून टाकण्याची सविताला दिलेली धमकी खरी करून दाखवली
सायखेडा शेत शिवारात आढळला एक मृतदेह
आर्णी तालुक्यातील सायखेडा शेत शिवारात एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रविवार दि. ३१ जुलैला आढळून आले. रामहरी लक्ष्मण बेले वय ५० वर्ष रा. सायखेडा असे मृताचे नाव असून त्याचा मृत्यूचे कारण अद्यापही कळू शकले नाही. या प्रकरणी आर्णी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटना स्थळाचा पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात सात महिन्यांच्या काळात ४५ घटना
जिल्ह्यात अवघ्या सात महिन्यांच्या काळात खुनाच्या तब्बल ४५ घटना घडल्या. त्यात घरगुती वाद, जुन्या वादाचा वचपा, दारुसाठी पैसे न देणे, अनैतिक संबंधाच्या संशयावरून चक्क खुन करण्यात आल्याचे दिसत आहे. ही परिस्थिती पाहता जिल्ह्यातील गुन्हेगारी पोलिसांच्याही नियंत्रणाबाहेर तर गेली नाही ना? असा प्रश्न पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

त्रिशा आणि नित्या दोघीही बहिणी झाल्या अनाथ, जबाबदारीचा मोठा प्रश्न
आर्णी तालुक्यातील सुकळी येथे अनैतिक संबंधाच्या संशयावरून विनोद याने पत्नी सविता ची हत्या केली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून सविताला दोन मुली आहे. यात त्रिशा वय ७ वर्ष ही सुकळी येथील शाळेत वर्ग दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे. तर नित्या ही ५ वर्षाची आहे. सविताच्या मृत्यूने त्रिशा आणि नित्या दोघीही बहिणी अनाथ झाल्या असून त्यांच्या जबाबदारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...