आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१४ जून रोजी वटपौर्णिमेचा सण येत असून या दिवशी महिलांनी महा रक्तदान शिबिरात रक्तदान करून अनोख्या पद्धतीने हा दिवस साजरा करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी केले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने १४ जून हा दिवस ‘जागतिक रक्त दाता दिवस’ म्हणून घोषित केलेला आहे. या दिवसाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. १४ जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासन व सामाजिक संस्थांच्या मदतीने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी वऱ्हाडे यांनी आज शासकीय अधिकारी व सामाजिक संस्थांची आढावा बैठक घेतली. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, शिक्षणाधिकारी प्रमोद सुर्यवंशी, रेडक्रॉस सोसायटीचे अध्यक्ष जलालुद्दीन गिलाणी, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राध्यापक घनश्याम दरणे प्रामुख्याने उपस्थित होते. आरोग्य विभागाला गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात रक्ताची आवश्यकता असते. त्यांची ही गरज भागविण्यासाठी महा रक्तदान शिबिरात सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संघटना, खाजगी संस्था, आस्थापना, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी व एनएसएसचे विद्यार्थी, खेळाडू, गणेशोत्सव व दुर्गादेवी मंडळ, शिकवणी वर्ग, उद्योजक, बचट गट व नागरिकांनी महा रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवावा. रक्तदानास इच्छुक आपल्या अधिनस्त कर्मचारी तसेच सहकारी वर्गाची यादी ८ जूनपर्यंत सादर करावी अशा सूचना वऱ्हाडे यांनी दिल्या. बैठकीला शासकीय विभागाचे विभागप्रमुख, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.