आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. ०८ मार्च २०२३ रोजी रिलायन्स फाउंडेशन व विकास गंगा समाजसेवी संस्था यांचे संयुक्त विद्यमाने सोनू मंगलम येथे महिला मेळावा पार पडला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या भावनाताई राऊत यांचे अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मेळाव्याचे उद्घाटन शालिनी जगताप यांनी केले. तर प्रमुख अतिथी म्हणून नरेंद्र खत्री, क्षेत्रीय प्रबंधक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, जितेंद्र चौधरी जिल्हा व्यवस्थापक रिलायन्स फाउंडेशन वृंदा कांबळे, शैलेश पाल, शाखा व्यवस्थापक विदर्भ कोकण ग्रामीण बँक, रामकृष्ण डुकरे शाखा व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र व मार्गदर्शक म्हणून नरेश मेश्राम, मुख्य प्रबंधक भारतीय स्टेट बँक, प्रविण बेंडे उमेद अभियान हे प्रामुख्याने उपस्थित होते.
घाटंजी तालुक्यातील बचत गटातील महिलांच्या उत्साहाने पार पडलेल्या या मेळाव्यात बचत गटाचे उत्कृष्ट व्यवस्थापन व व्यवसाय करणाऱ्या विविध बचत गटांना बँके कडून ८० लाखांपेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गटांतील महिलांना मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देत बँकांकडून मिळणारे कर्ज हे महिलांचा सन्मान वाढविण्यासाठी तसेच प्रगतीचे मार्ग मोकळे करणारा असल्याने पैशाचा योग्य ठिकाणी व उत्पादक कामासाठी जपून वापर करून कर्जाची वेळेत परतफेड करण्याचे आवाहन विकास गंगा संस्थेचे अध्यक्ष रणजित बोबडे यांनी प्रास्ताविकात केले. महिलांनी बचत गट व्यवसायसोबत उत्पादनाचे मार्केटिंग करण्यावर जोर द्यावा असे भावना राऊत यांनी अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले.
व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक ते सहकार्य पुरवणार असल्याचा विश्वास जितेंद्र चौधरी यांनी याप्रसंगी महिलांना दिला. महाराष्ट्र बँकेच्या आम्रपाली कावळे, विकासगंगा संस्थेच्या संचालक सविताताई मोहाडे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी नीलेश त्रिपाठी उमेद अभियान कक्ष, विलास मालाधारी जिल्हा कार्यक्रम अधिकारी रिलायन्स फाउंडेशन व डॉ. पूजा मानकर, सुभाष वैद्य, सरिता वालकर प्रभाग समन्वयक उमेद अभियान प्रामुख्याने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमित गाडबैल, निलेश खडसे व निता सुरस्कर यांनी संयुक्तपणे तर आभारप्रदर्शन विनोद गुजलवार यांनी केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.