आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धगधगत्या चितांवर कोरोना स्वार:एका दिवसात 39 रुग्णांचा मृत्यू; दरदिवशी मोठ्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने वाढला ताण

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आता आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट मिळणार 24 तासांत

जिल्ह्यात कोरोनामुळे दरदिवशी होणाऱ्या मृत्यूमुळे संपुर्ण जिल्हा हादरला असतानाच बुधवारी २१ एप्रिल रोजी २४ तासांत तब्बल ३९ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत एका दिवसात झालेले हे सर्वाधिक मृत्यू आहेत.दरदिवशी कोरोनाने मृत्यु होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे आता स्मशानात अंत्यसंस्कारासाठी मृतदेहांना जागाच शिल्लक राहत नसल्याने तासंतास प्रतीक्षा करावी लागत आहे. कोरोनाने आता जिल्ह्यातही थैमान घातले आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळुन येत आहेत. त्यासोबतच दरदिवशी कोरोनाने होणाऱ्या मृत्यूंची संख्याही प्रचंड वाढली आहे. वाढलेल्या रुग्णसंख्येपुढे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कमी पडत असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाशी दोन हात करुन थकलेल्या आरोग्य यंत्रणेवर आता आणखीनच बोजा पडत आहे. विनाकारण घराबाहेर पडणाऱ्यांची संख्याही कमी होताना दिसत नाही हे वास्तव आहे.

जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात असल्याची चिन्हे आहेत. त्याच गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ३९ मृत्यू झाले .यातील ३१ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर आठ मृत्यु खासगी रुग्णालयात झाले आहेत. तसेच एक मृत्यु जिल्ह्याबाहेरील आहे. याच काळात नव्या ९२९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली. यादरम्यान ८८५ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यात बुधवारी एकूण ५७२९ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ९२९ जण नव्याने पॉझिटिव्ह आले.

आता आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट मिळणार २४ तासांत
यवतमाळ | नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी केल्यावरसुद्धा रिपोर्ट लवकर मिळत नाही. त्यामुळे प्रादुर्भाव वाढण्यास मदत होते, या बाबींची गंभीर दखल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली. चाचणीचा अहवाल लवकरात लवकर नागरिकांना कसा देता येईल, याबाबत जिल्हा प्रशासनाने योग्य नियोजन केले. त्याचे फलित म्हणून आता २४ तासाच्या आत संबंधित व्यक्तिचा चाचणी अहवाल मोबाइलवर पाठविला जात आहे. परिणामी प्रयोगशाळेत चाचण्यांचा प्रलंबित आकडा शून्यावर आणण्यात प्रशासनाला यश आले असल्याचे सांगण्यात आले आहे.

जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्या करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हे कोरोनाविरुध्दच्या लढाईतील मुख्य शस्त्र आहे. मात्र चाचणीसाठी नमुने पाठविल्यावरसुध्दा अहवाल लवकर प्राप्त होत नसल्याने संबंधित व्यक्ती हा तोपर्यंत इतरांच्या संपर्कात येत असे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले. या गोष्टीला आळा घालण्यासाठी प्रयोगशाळेत नमुने प्राप्त झाल्यानंतर २४ तासाच्या आत चाचणी अहवाल उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व रोगनिदान प्रयोगशाळेत (व्हीआरडीएल लॅब) सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले. लॅबमध्ये नमुन्याची तपासणी झाल्यावर सॉफ्टवेअरच्या माध्यमातून संबंधित नागरिकाला आता २४ तासाच्या आत चाचणी अहवाल उपलब्ध होत आहे.

उपचाराअभावी अनेकांचा मृत्यू
जिल्ह्यात दरदिवशी कोरोनाग्रस्तांचे मृत्यू होत आहे. मात्र यामध्ये काही रुग्णांचा मृत्यू वेळात उपचार न भेटल्यानेही होत आहे. जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर, ऑक्सिजनचे बेडच शिल्लक नाही. अशा ठिकाणी अत्यवस्थ अवस्थेत आणलेल्या रुग्णांना वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे.

अंत्यसंस्कार करताना यंत्रणेचीही धावपळ
एकाच दिवशी मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचे मृत्यु होत आहे. अशा मृतदेहांवर अंत्य संस्काराचे काम करणारी यंत्रणा मोजकी आहे. आता या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्या यंत्रणेची चांगलीच धावपळ होत आहे.

जिल्ह्यात २४ तासांत ९२९ नव्या पॉझिटिव्हची भर, एकाच दिवसात झालेले सर्वाधिक मृत्यू
जिल्हा रुग्णालयात बेडची मारामार : इतर जिल्ह्याप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही कोरोना रुग्णालयात बेडची अवस्था बिकट झाली आहे. जिल्हा रुग्णालयात तर कोरोनाग्रस्तांसाठी असलेले सर्व ५७७ बेड फुल्ल असल्याने त्या ठिकाणी एकही बेड शिल्लक नाही. चार डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १०७ बेड शिल्लक आहेत तर २३ खासगी रुग्णालयात २०८ बेड शिल्लक असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रत्यक्षात मात्र त्या ठिकाणी देखील बेडची मारामार सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...