आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात मृतांचा आकडा हजारी पार:24 तासांत 1220 नवीन पॉझिटिव्ह रुग्णांची भर, 5829 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तर 1112 कोरोनामुक्त

यवतमाळ15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सर्व बेड हाऊसफुल्ल झाल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वाट पाहावी लागत आहे.
  • मृतांचा आकडा 1 हजार पार दिवसभरात पुन्हा 37 बळी; दरदिवशी पुढे येणारे आकडे भयावह, मृत्युदर 2.13 वर

जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे सत्र काही केल्या थांबत नसून सातत्याने होणाऱ्या या मृत्यूमुळे जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्युचा आकडा आता १ हजाराची संख्या पार करुन १०२४ वर पोहोचला आहे. त्यात गुरूवारी २२ एप्रिल रोजी २४ तासांत तब्बल ३७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या १२२० रुग्णांचा हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा हे विशेष जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या मृत्युमुळे मृत्युदर ही वाढुन थेट २.१३ वर पोहोचला आहे.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. त्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजनांची पराकाष्ठा करण्यात येत आहे. असे असले तरी दरदिवशी मोठ्या प्रमाणात आढळुन येणारे नवे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनाग्रस्तांच्या मृत्युंचा आकडा पाहता या दोन्हींवर प्रशासनाला नियंत्रण मिळवता आलेले नाही. दरदिवशी पुढे येणारे आकडे भयावह असून, मोठ्या संख्येने आढळुन येणाऱ्या रुग्णांवर उपचार करताना मोठ्या अडचणी येत आहेत. उपचार वेळात न मिळाल्यानेही काही रुग्णांचे मृत्यु होत असल्याचेही आता सांगण्यात येत आहे.

विदर्भ हाउसिंग सोसायटी सील
शहरातील अँग्लो हिंदी चौक परिसरात असलेल्या विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसरात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळुन आले आहेत. त्यासोबतच या ठिकाणी काही कोरोना रुग्णांचा मृत्युही झाला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून विदर्भ हाउसिंग सोसायटी परिसर पुर्णपणे प्रतिबंधित करण्यात आला आहे.

स्मशानभूमीत चितांची रोजच लागलेय रांग
एकाच दिवशी मोठ्या संख्येने कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु होत आहे. मृत्यु झालेल्या सर्व रुग्णांच्या मृतदेहांवर त्याच दिवशी अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यामुळे पांढरकवडा मार्गावर असलेल्या स्मशानभूमीत एकाशेजारी एक चिता रचण्यात येतात. त्यामुळे या ठिकाणी चितांची चक्क रांग लागलेली पहावयास मिळत आहे.

बेडसाठी वाट पाहणाऱ्या रुग्णांचे हाल बेहाल
जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड हाऊसफुल्ल आहे. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना वाट पाहावी लागत आहे.गुरुवारी दिवसभरात ३७ मृत्यु झाले आहे. यातील ३२ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पाच मृत्यु खासगी रुग्णालयात झाले. एका दिवसात पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे हे विशेष.

फेक मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये
जिल्हाधिकारी यवतमाळ व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या नावाने फेक मेसेज ग्रुपवर व्हायरल होत आहे. सदर मेसेजचा जिल्हा प्रशासनाशी काहीही संबंध नाही. सदर मेसेज पूर्णपणे चुकीचा व अफवा पसरवणारा असून अशा कोणत्याही सुचना जिल्हाधिकारी कार्यालय, यवतमाळ आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्याकडून देण्यात आल्या नाही. शासन आणि प्रशासनाच्या वतीने दिल्या जाणा-या मार्गदर्शक सुचना नागरिकांपर्यंत अधिकृतरित्या प्रसारमाध्यमांद्वारे पोहोचवण्यात येतात. त्यामुळे फेक मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे.

जिल्हा रुग्णालयातील सर्व बेड गेल्या ३ दिवसांपासून हाऊसफुल्ल आहेत. त्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना फिव्हर ओपीडीत बेडसाठी वेटींगवर रहावे लागत आहे. त्यातही गंभीर रुग्णांना त्याच ठिकाणी ऑक्सिजन लावून मिळेल त्या जागेवर ठेवण्यात येत आहे. त्या ठिकाणी बेडसाठी वेटिंगवर असलेल्या रुग्णांची स्थिती दर्शवणारी ही काही बोलकी छायाचित्र.यावरुन आरोग्य यंत्रणेवरील वाढता ताण आणि रुग्णांचा भार किती याची प्रचिती येते.

जिल्हा रुग्णालयात नाही एकही बेड
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात असलेल्या एकूण ५७७ बेड पैकी सध्या रुग्णांसाठी एकही बेड शिल्लक राहिलेला नाही. गेल्या ३ दिवसांपासून ही स्थिती कायम आहे. जिल्ह्यातील चार डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये २४० बेड पैकी ६९ बेड शिल्लक आहेत. त्यासोबतच २३ खासगी कोविड रुग्णालयात १९५ बेड शिल्लक आहेत. जिल्ह्यातील ३१ कोविड केअर सेंटरमध्ये एकूण २३८३ बेड पैकी ७३६ शिल्लक आहेत.

बातम्या आणखी आहेत...