आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा शासकीय रुग्णालयाचा एक भाग असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या एका ५५वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा शहरातील लोहारा परिसरातील शिवाजी नगर शेत शिवारात शुक्रवारी संशयास्पद मृतदेह आढळला. तो रुग्ण २६ मार्च रोजी विना परवानगी रुग्णालयातून निघून गेला होता. तर मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात त्याच्या मुलाने तक्रार दाखल केली होती. विशेष म्हणजे मृतदेहाची कोरोना तपासणी केल्यावर तो पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट प्राप्त झाला. या प्रकारामुळे एकच खळबळ माजली अाहे. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नसून,शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळणार आहे. शंकरराव देशमुख वय ५५ वर्ष रा. नेर, असे मृताचे नाव आहे.दरम्यान,रूग्णालयात आणि रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षक तैनात असताना देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क रुग्णालयातील पळून गेल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शहरातील लोहारा चौक परिसरात राहणाऱ्या दामोदर बडे यांच्या लोहारा शिवारातील शेतात गुरुवारी काम करणाऱ्या गड्याला लाकडी फाट्याच्या मचांगवर एक व्यक्ती मृतावस्थेत आढळून आला. नागरिकांनी मृतदेह पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तद्नंतर परिसरातील नागरिकांनी याची माहिती लोहारा पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळावर धाव घेवून मृतदेहाची पाहणी केली. तद्नंतर मृतदेह उत्तरीय तपासणी करिता जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला. दरम्यान, लोहारा पोलिसांनी मृताची ओळख पटवण्याकरिता शोध मोहीम सुरू केली. त्यावेळी यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीची मिसिंग तक्रार असल्याची माहिती त्यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी विचारपूस केली असता, तो व्यक्ती नेर शहरातील शंकरराव देशमुख असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे कोरोना तपासणी केल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळून आले होते.
त्यामुळे त्यांना यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील कोविड सेंटरमध्ये उपचारांकरिता भरती करण्यात आले होते. मात्र, दि. २६ मार्चला शंकरराव देशमुख हे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून विना परवानगी निघून गेले होते. याबाबतची माहिती त्याच्या मुलाला मिळाल्यानंतर त्याने दि. ३० मार्चला यवतमाळ शहर पोलिस ठाणे गाठून मिसिंगची तक्रार दाखल केली होती. त्या दिवसांपासून पोलिसांसह नातेवाइक सुद्धा त्यांचा शोध घेत होते. शेवटी लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका शेत शिवारात त्यांचा मृतदेह आढळून आला. या प्रकारामुळे एकच गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. मृत्यूनंतर तपासणी केली असता, ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. त्यांचा मृत्यू कोरोनामुळे झाला की घातपात आहे, याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. पुढील तपास ठाणेदार मिलन कोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
रूग्णालयाची बेफिकिरी
नेर शहरातील ५५ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधून दि. २६ मार्चला पळून गेला. मात्र या घटनेचे कुठलेही गांभीर्य प्रशासनाने घेतल्याचे चार दिवसांत दिसले नाही. चौथ्या दिवशी रुग्णाच्या कुटुंबातील सदस्याने शहर पोलिस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली. त्यावरून रुग्णालय प्रशासन किती बेफिकीर आहे हे दिसून आले आहे.
अहवाल येताच पोलिस कर्मचाऱ्यांचे वाढले टेन्शन
लोहारा परिसरात मृतदेह असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिस कर्मचाऱ्यांनी मृतदेह लाकडी मचांगवरून खाली उतरवला. दरम्यान, मृतदेह रुग्णालयात उत्तरीय तपासणीकरीतासुद्धा पाठवण्यात आला होता. तत्पूर्वी रुग्णालय प्रशासनाने कोरोना तपासणी केल्यामुळे तो व्यक्ती पॉझिटिव्ह आला. या प्रकारामुळे पंचनामा करणाऱ्यासह मृतदेह उचलणाऱ्यांचे चांगलेच टेन्शन वाढले असून, त्यांच्यातही भीती निर्माण झाली आहे.
रूग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न एैरणीवर
यवतमाळ जिल्हा शासकीय रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहे. त्या ठिकाणी रुग्णालयात आणि रूग्णालयाबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. असे असतांना देखील एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण चक्क रुग्णालयातील पळून गेल्याने जिल्हा शासकीय रुग्णालयातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
सिटी स्कॅनसाठी पाठवल्यानंतर पळाला
रूग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर सिटी स्कॅन करण्यात येते. त्या अनुषंगाने दोन ते तीन जणांना पाठवण्यात आले होते. मात्र, त्याचवेळी ते रुग्णालय परिसरातून पळून गेले होते. याचे गांभीर्य ओळखून शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचप्रमाणे त्यांच्या नातेवाइकांनासुद्धा माहिती दिली होती. डॉ. मिलिंद कांबळे, वै.अधिष्ठाता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.