आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्र दिन उत्साहात:राज्याच्या प्रगतीत, जडणघडणीत यवतमाळ जिल्ह्याचा मोठा वाटा; ध्वजारोहणाप्रसंगी पालकमंत्री संदिपान भुमरे यांचे प्रतिपादन

यवतमाळ23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ६२ वा वर्धापन दिन आपण साजरा करत आहोत. या ६२ वर्षातील राज्याच्या प्रगतीत व जडणघडणीत यवतमाळ जिल्ह्याचा मोठा वाटा असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी केले. दि. १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री संदीपान भुमरे यांनी येथील पोस्टल मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे प्रामुख्याने उपस्थित होते.

पालकमंत्री पुढे बोलतांना म्हणाले की, यवतमाळ जिल्ह्याने महाराष्ट्राला वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक हे दोन मुख्यमंत्री दिले. या दोघांनी देशाला दिशादर्शक ठरतील अशा योजना आणि धोरणांची मुहूर्तमेढ रोवली. सलग ११ वर्ष मुख्यमंत्री राहिलेले वसंतराव नाईक यांनी देशात हरितक्रांती घडवून आणली. त्यांनी महाराष्ट्रात सुरू केलेली रोजगार हमी योजना केंद्र शासनाने संपुर्ण देशासाठी लागू केली. यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला.

खाजगी व सार्वजनिक मालमत्तांची निर्मिती होउन देशात पायाभूत सुविधा तयार झाल्या. आज योगायोगाने मी त्याच खात्याचा मंत्री आहे, याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी देशात पहिल्यांदाच जलसंधारण‌ चळवळीचा पाया रचल्याचे त्यांनी सागीतले. ज्या यवतमाळ जिल्ह्याने राज्याला दोन मुख्यमंत्री दिले त्या यवतमाळ जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून काम करतांना मला मनस्वी आनंद होत असल्याचेही ते म्हणाले.

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासन कायम प्रयत्नशील आहे. मराठी भाषेचा विकास व संवर्धनाकरिता मुंबईत ‘मराठी भाषा भवन’ उभारण्यात येत आहे. यासाठी राज्य शासनाने अर्थसंकल्पात १०० कोटी निधी राखीव ठेवला असून नुकतेच गुढीपाडव्याला या भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती दिली आणि महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना अभिवादन केले.

यवतमाळ जिल्ह्यात सामाजिक न्यायाच्या आणि जनकल्याणाच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना, निवासी शाळा, निवासी वसतीगृहे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, स्टॅंड अप योजना, रमाई आवास योजना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना या महत्वाच्या योजनांमध्ये जिल्ह्यात चांगले काम झाले असल्याचा उल्लेख त्यांनी केला.

आजपासून शिक्षण विभागात महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम अंतर्गत १०५ लोकसेवा नव्याने अधिसूचित करण्यात आल्याचे तसेच लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘शिक्षण संवाद दिन’ सुरू करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. पालकमंत्री यांनी महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सर्वाना शुभेच्छा दिल्या. ध्वजारोहणानंतर त्यांनी पोलीस दल परेड संचलनाची पाहणी केली. उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

यवतमाळ जिल्ह्याने ६४ लाख ४६ हजार रुपये सशस्त्र सेना ध्वजदिन निधी उद्दिष्टाच्या १२७ टक्के संकलित केल्याने सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे जिल्हाधिकारी अमोल येडगे व प्रभारी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांना पालकमंत्री यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले. २८ सप्टेंबर २०२१ रोजी उमरखेड-पुसद मार्गावर दहागाव येथील बस दुर्घटनेत बसमधील प्रवाशांचे जीव वाचवण्यात मदत केल्याबद्दल महागाव येथील नागरिक अविनाश सवाई राठोड यांचा सत्कार करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...