आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैराट व्यसनाधिनता:दारूची तल्लफ भागवण्यासाठी चक्क सॅनिटायझरचे प्राशन, 6 तरुणांचा मृत्यू

वणी13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ वणीत दाखल झाले .

कोरोनामुळे लावलेल्या टाळेबंदीत शोधूनही दारू न मिळाल्याने एकत्र आलेल्या तरुणांनी तल्लफ भागवण्यासाठी चक्क सॅनिटायझर प्राशन केले. यात वणी शहरात शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांत अनुक्रमे दोन आणि चार अशा तब्बल सहा तरुणांचा मृत्यू झाल्याने शहरात खळबळ उडाली अाहे. मृत तरुणांच्या जीवावर सॅनिटायझरची पार्टी बेतल्याचे बोलले जात आहे. तर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ वणीत दाखल झाले आहे. दत्ता कवडू लांजेवार वय ४७ वर्ष रा. तेलीफैल, नूतन देवराव पाटणकर वय ३५ वर्ष रा. ग्रामीण रुग्णालय जवळ, संतोष मेहर वय ३५ वर्ष रा. एकता नगर, भारत प्रकाश रुईकर वय ३८ वर्ष रा. जटाशंकर नगर असे दगावलेल्या तरुणांची नावे आहेत. दोन दिवसांत दगावलेल्या सहा तरुणांपैकी केवळ दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले असून पोलिस दप्तरी त्यांची नोंद केली आहे. परंतु अन्य मृतांच्या नातेवाइकांनी परस्पर अंत्यसंस्कार केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

शहरातील विविध भागात वास्तव्यास असलेले व्यसनी तरुण शुक्रवारी एकत्रित आले.त्यांनी सॅनिटायझर पार्टीचा बेत आखला. तीस मिली सॅनिटायझरची नशा एका निप एवढी होत असल्याचा ग्रह करीत त्यांनी मोठ्या प्रमाणात सॅनिटायझर विकत घेतले. या पार्टीत किमान सहा ते सात युवक होते,अशी चर्चा असून त्या तरुणांनी मनसोक्त सॅनिटायझर प्राशन केले. काही वेळातच त्यांना मळमळ व उलट्या व्हायला लागल्या. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे दि. २३ एप्रिलला शहरातील जैताई नगर येथे वास्तव्यास असलेले गणेश उत्तम शेलार वय ४३ वर्ष तर सुनील महादेव ढेंगळे वय ३६ वर्ष असे दोघे सॅनिटायझर प्राशन केल्याने दगावल्याची माहिती मिळाली आहे. तर शनिवारी तब्बल चार तरुणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शहरातील अल्कोहोलिक व्यसनी व्यक्ती जीवाची पर्वा न करता सॅनिटायझर प्राशन करीत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

तल्लफ भागवण्यासाठी मद्यपींचे विविध फंडे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी सोबतच सर्वत्र संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दारू दुकानेही बंद ठेवण्यात आली आहे. अशात लपून छपून अव्वाच्या सव्वा दराने विकल्या जात असलेली दारू विकत घेणे मद्यपींकरिता कठीण झाले आहे. ‘ना दुवा ना दारू’ अशीच काही अवस्था कोरोनाच्या काळात मद्यपींची झाली असताना तल्लफ भागवण्यासाठी विविध फंडे अवलंबण्यात येत आहे. अशात व्यसनी तरुण नशेकरिता सॅनिटायझरचा वापर करत असल्याचे वास्तव या घटनेमुळे समोर आले आहे.

घटना दुर्दैवी, समाज जागृतीची नितांत गरज
संपूर्ण प्रशासन कोविड १९ च्या नियंत्रणासाठी कामाला लागले आहे. नागरिकांनी खबरदारी घेणे गरजेचे आहे. वेळोवेळी शासनाने दिलेले निर्देश नागरिकांनी पाळावे. सॅनिटायझर प्राशन करून वणीत सहा तरुणांचा मृत्यू झाला. ही बाब अतिशय दुर्दैवी असून सॅनिटायझरचा उपयोग हा कोरोनापासून बचाव करण्यासाठी आहे. मात्र अज्ञानामुळे व्यवसनाधीन याचे प्राशन करत आहे. याबाबत समाज माध्यमाद्वारे जागृती करणे गरजेचे झाले आहे. डाॅ. दिलीप भुजबळ, जिल्हा पोलिस अधीक्षक, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...