आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायवतमाळ जिल्ह्यात येणाऱ्या मात्र यंदा लिलाव न झालेल्या दही सावळी रेती घाटावर शेजारच्या नांदेड जिल्ह्यातील लांजी रेती घाट धारकाने अवैधरीत्या ठिय्या मारुन रेतीचा अवैध उपसा करण्याचा सपाटा लावला होता. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशीत करुन प्रशासनाचे लक्ष त्याकडे वेधले होते. या वृत्ताची दखल घेत अप्पर जिल्हाधिकारी यांनी दही सावळी रेती घाटावर दिलेल्या धडकेमुळे लांजी रेती घाटावर सुरू असलेला प्रकार उघडकीस येवुन नांदेड महसुल विभागाने त्या रेती घाटावर बुधवार दि. ११ मे रोजी तातडीने कारवाई केली.
यवतमाळ जिल्ह्याशेजारी असलेल्या नांदेड जिल्ह्यातील लांजी रेती घाट धारकाने सर्व नियम पायदळी तुडवत चक्क ट्रेझरबोट, पोकलॅन आणि जेसीबी सारखे अजस्त्र यंत्र थेट नदीपात्रात उतरवले. या यंत्रांच्या सहाय्याने लांजी रेतीघाटासोबतच त्याच्या रेतीघाटाशेजारी असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील दहि सावळी या लिलाव न झालेल्या रेतीघाटातुन रेतीचा अवैध उपसा सुरू केला होता. मोठ्या प्रमाणात करण्यात येत असलेल्या अवैध रेती उपशामुळे दरदिवशी शेकडो ब्रास रेती पुसद, वाशीम या ठिकाणी ओव्हरलोड वाहतुकीद्वारे वाहुन नेण्यात येत आहे. यासंदर्भात दैनिक दिव्य मराठीने सविस्तर वृत्त प्रकाशीत करुन महसुल प्रशासनाचे लक्ष वेधले. त्यावरुन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या निर्देशावरून दुसऱ्याच दिवशी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे दहि सावळी रेती घाटावर पाहणी करण्यासाठी निघाले. मात्र त्यांच्या येण्याची माहिती मिळताच रेती तस्करांनी सर्व यंत्रसामग्री हलवली.
दरम्यान काही दिवस लोटताच बुधवार दि. ११ मे रोजी दुपारी अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांनी अचानक दही सावळी रेती घाटावर धडक दिली. यावेळी त्यांना दही सावळी रेती घाटात कुठलाही उपसा सुरू असल्याचे आढळले नाही. मात्र दुसऱ्या बाजुला असलेल्या लांजी रेती घाटावर ट्रेझर बोट आणि इतर यंत्रसामुग्रीने नियमबाह्य उपसा सुरू असल्याचे आढळुन आले. त्यामुळे अप्पर जिल्हाधिकारी दुबे यांनी तातडीने नांदेड अप्पर जिल्हाधिकारी परदेशी यांना त्याबाबत माहिती दिली. त्या माहितीवरून नांदेड अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी माहुर सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देत तातडीने पथक कारवाईसाठी रवाना केले. या पथकाने अवघ्या काही वेळात लांजी रेती घाट गाठुन त्या ठिकाणी असलेल्या ट्रेझर बोट आणि इतर यंत्रसामग्री जप्त केली.
बाभुळगावच्या नांदेसावंगी घाटावर ही कारवाई : बाभुळगाव तालुक्यात असलेल्या नांदेसावंगी या रेती घाटाचा लिलाव करण्यात आला आहे. मात्र या रेती घाट धारकाकडून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नांदेसावंगी रेती घाटावर कारवाई करण्याचे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी प्रमोद सिंह दुबे यांना दिले. त्यावरुन अप्पर जिल्हाधिकारी यांनी बुधवार दि. १० मे रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक नांदेसावंगी या रेती घाटावर धडक दिली. यावेळी रेती घाटामध्ये २ ट्रेझर बोटच्या माध्यमातुन रेतीचा उपसा सुरू असल्याचे आढळुन आले. दंडासंदर्भात नोटीस बजावण्यात आली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.