आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:यवतमाळकर चाखणार स्थानिक द्राक्षांची चव; कापसाच्या पंढरीत फुलवली दाक्षाची बाग

यवतमाळ4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्राक्ष म्हटले की आपल्यासमोर येतो तो सर्वप्रथम नाशिक जिल्हा. थंड वातावरणातच द्राक्षाचे पिक घेतल्या जाते हा समज आता यवतमाळ जिल्ह्यातील युवा शेतकऱ्याने मोडीत काढला आहे. राळेगाव तालुक्यातील वाढोनाबाजार येथील उमेश झाडे या तरुणाने सव्वा एकरात द्राक्षांची लागवड केली आहे. कापसाच्या पंढरीत यशस्वी प्रयोग करणाऱ्या उमेश यांच्या बागेतील द्राक्षांची चव लवकरच यवतमाळकरांना चाखायला मिळणार आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कापूस व सोयाबीन ही पिके घेतली जातात. जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील वाढोना बाजार येथील उमेश झाडे या शेतकऱ्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्याप्रमाणे द्राक्षांची लागवड केली. यवतमाळ जिल्हा कापसासाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच तो नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्यांनी काळवंडला आहे. या जिल्ह्यातील एका बहाद्दर शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा देत चक्क नाशिकप्रमाणे द्राक्ष शेती फुलवली आहे. द्राक्षाचा पीक घेण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयोग असून, सव्वा एकरात द्राक्षही लागले आहेत. हा यवतमाळ जिल्ह्यातील कोरडवाहू शेतीत त्याने यशस्वी तसाच अभिनव प्रयोग केला आहे.

...म्हणून घेतला निर्णय : युवा शेतकरी उमेश इतरांप्रमाणेच कापूस व सोयाबीन पीक घेत होते. बाजारपेठेत मालाला भाव मिळत नसल्याने शेती तोट्याची ठरत होती. तोट्यात असलेल्या शेतीला नफ्यात आणण्यासाठी उमेश याने द्राक्ष शेती करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पंढरपूरजवळील कासेगाव येथून कलमा आणल्या. १ डिसेंबर २०२० ला सव्वा एकरात पंधराशे कलमांची ८ बाय ४ वर लागवड केली. तीन महिन्यानंतर त्याची रीकट केली.

जिद्द, कष्टाने जगवले पीक
यवतमाळ जिल्ह्यात द्राक्ष शेती करण्याची हिंमत शेतकरी करत नाही. द्राक्ष शेतीचा खर्च सामान्य शेतकऱ्याच्या आवाक्याबाहेरचा आहे. द्राक्षबाग आपल्याकडे होत नाही. खर्च पाण्यात जाईल, असे म्हणत उमेश झाडे यांना अनेकांनी वेड्यात काढले. तरीही उमेश यांनी जिद्दीने व कष्टाने सव्वा एकरवर बाग जगवली. त्यासाठी आठ लाख रुपये खर्च केला. उमेश यांना उत्पन्न मिळणे सुरू झाले असून यंदा दहा लाखापर्यंत उत्पन्न होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पुढल्या वर्षी दोनशे टन उत्पन्न घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...