आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाती विमा:सरपंच राम धुमाळांचा पुढाकार, प्रत्येकी 10 लाखांचे विमा संरक्षण, पूर्वीच्या दुर्दैवी घटनेने घेतला निर्णय

कडा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जवळगाव (ता. आष्टी) येथील सरपंच राम धुमाळ यांनी विशेष शिबिर घेत गावातील १०० कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींचा प्रत्येकी १० लाख रुपयांचा अपघात विमा स्वखर्चाने उतरवला. पंधरवड्यापूर्वी जवळगावातील एका बांधकाम मजुराचा अपघाती मृत्यू झाला होता. त्याच्या अकाली निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला. त्या मजुराचा विमा असता तर किमान काही मदत तरी त्यांच्या वारसांना मिळाली असती. यापुढे गावात अशी दुर्दैवी घटना घडली तर काय, असा प्रश्न सरपंच धुमाळ यांच्या मनात आला.

पोस्ट खात्याची ३९९ रुपयांत १० लाख रुपयांचा वार्षिक विमा या योजनेची माहिती त्यांना समजली होती. त्यांनी आपल्या सहकारी ग्रामपंचायत सदस्यांच्या सहकार्याने गावातच पोस्ट कर्मचाऱ्यांना बोलावून विमा शिबिर घेतले. गावकऱ्यांना योजनेची माहिती दिली आणि १०० लोकांचा स्वखर्चाने विमा उतरवला. जे लोक ३९९ रुपये देऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी पैसे खर्च करा, असे सांगितले. त्यामुळे पुढील काळात आपण आणखी काही कुटुंबांतील कर्त्या व्यक्तींचा विमा उतरवण्यासाठी शिबिर घेणार असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

कुटुंब उघड्यावर पडू नये
कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे अपघाताने अकाली निधन झाले, तर ते कुटुंब उघड्यावर पडते. विमा संरक्षण असेल तर काही तरी मदत होईल यासाठी गावातील १०० कुटुंबातील कर्त्या व्यक्तींचा अपघात विमा उतरवल्याचे सरपंच धुमाळ यांनी सांगितले.

दाेन योजनांतील फरक असा
पोस्टाच्या ३९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये अपघाती मृत्यूनंतर त्याच्या २ मुलांना शिक्षणासाठी १ लाखांपर्यंत मदत मिळते. तसेच १० दिवस रोज १ हजार रुपये, २५ हजार रुपये वाहतूक खर्च व मृत्यूनंतर ५ हजार रुपये अंत्यसंस्कार खर्च मिळतात. मात्र, २९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये हे सर्व खर्च मिळत नाहीत असा योजनांत फरक आहे.

काय आहे अपघात विमा योजना
पोस्ट खात्याच्या या योजनेत २९९ किंवा ३९९ रुपयांच्या हप्त्यात एका वर्षासाठी १० लाख रुपयांपर्यंतचा विमा आहे. अपघाती मृत्यू झाल्यास, कायमचे, आंशिक अपंगत्व आल्यास १० लाखांपर्यंत संरक्षण दिले जाईल. विमाधारकास रुग्णालयात दाखल केल्यास ६० हजारांपर्यंतचा खर्च, घरीच उपचार घेतल्यास ३० हजार रुपयांपर्यंत दावा करता येणार आहे. रुग्णालयाच्या खर्चासाठी १० दिवसांसाठी रोज हजार रुपये मिळतील. कुटुंबाच्या वाहतुकीसाठी २५ हजारांंपर्यंतचा खर्च मिळेल. विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अंत्यसंस्कारासाठी ५ हजार रुपये तसेच या विम्याअंतर्गत त्याच्या किमान दोन मुलांच्या शिक्षणासाठी १ लाखांपर्यंत रक्कम मिळते.