आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिक्षण विभागाकडून जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण ५ जुलै ते २० जुलैदरम्यान करण्यात आले होत. त्यात केवळ दहा बालके शाळाबाह्य आढळून आली, तर अनियमित उपस्थिती असलेली फक्त २८ बालके आढळून आली आहेत. ही सर्व आकडेवारी पाहता हे सर्वेक्षण कसे झाले असेल, असा प्रश्न शिक्षणप्रेमींनी उपस्थित केला आहे.
बीड जिल्हा हा प्रामुख्याने ऊसतोड मजुरांचा जिल्हा आहे. जिल्ह्यात लाखो ऊसतोड मजूर स्थलांतर करतात. यात त्यांच्या मुलांचीही फरफट होते. परिणामी, ते शिक्षणापासून वंचित राहतात. कोरोनामुळेदेखील अनेक विद्यार्थी शाळेत जाऊ शकले नाहीत. स्थलांतर, अज्ञान, सुविधांचा अभाव आदी कारणांमुळे शाळाबाह्य मुलांची संख्या वाढत आहे. शिक्षण हक्क कायद्याची (आरटीई) प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शाळाबाह्य बालकांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणामध्ये जिल्ह्यात केवळ १० बालके शाळाबाह्य असल्याचे समोर आले आहे. यात मुलांची संख्या २, तर मुलींची संख्या ८ आहे. अनियमित शाळेत उपस्थिती असणारी विद्यार्थी संख्या केवळ २८ आहे. मुले १६, तर मुलींची संख्या १२ एवढी आहे. आठ तालुक्यांत शंभर टक्के मुले शाळेत जातात हे असे कागदोपत्री पुढे आले आहे.
आठ तालुक्यांत १०० टक्के मुले जातात शाळेत?
अजब विभागाचे हे गजब संशोधन : मनोज जाधव
अनेक बालके आजही बालमजुरी करताना दिसतात. मग या सर्व्हेतून ३ ते १८ या वयोगटातील सर्वेक्षणात फक्त दहा शाळाबाह्य बालके कशी आढळली हा मोठा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे हे अजब शिक्षण विभागाचे गजब सर्वेक्षण असल्याचे मत मनोज जाधव यांनी व्यक्त केले आहे.
मार्चमध्ये १७७ मुले आढळली होती अनियमित
शिक्षण संचालकांच्या सूचनेनुसार, १ मार्च ते १० मार्च २०२२ दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते. त्या वेळी तर चक्क एकही बालक शाळाबाह्य आढळून आले नव्हते, तर अनियमित उपस्थिती असलेली १७७ बालके आढळून आली होती.
अनियमित येणारे तालुकानिहाय विद्यार्थी असे :
शाळेत अनियमित येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये धारूर तालुक्यात २ मुले, गेवराई तालुक्यात ६ मुले आणि ४ मुली, पाटोदा तालुक्यात ५ मुले आणि ५ मुली, वडवणी तालुक्यात १ मुलगा आणि ३ मुली अशी १६ मुले आणि १२ मुली म्हणजे एकूण २८ विद्यार्थी अनियमित आहेत.
तीन तालुक्यांतच शाळाबाह्य मुले
जिल्ह्यात अंबाजोगाई तालुक्यात २ मुली, आष्टी तालुक्यात ४ मुली तर बीड तालुक्यात २ मुले आणि २ मुली असे एकूण दहाच विद्यार्थी शाळाबाह्य असल्याचे शिक्षण विभागाचा अहवाल सांगतो. मात्र, शिक्षणप्रेमींच्या म्हणण्यानुसार, जिल्ह्यात शेकडो बालके अद्यापही शाळाबाह्य आहेत.
पटनोंदणी पूर्ण झालेली आहे
जिल्ह्यात शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष सुरू होताना शंभर टक्के पटनोंदणीची मोहीम राबवली जाते. त्यामुळे शाळाबाह्य मुलांची संख्या कमी असते. बालकामगार जे दिसतात त्यांचेही नाव कुठल्या ना कुठल्या शाळेत असते. मात्र, ते अनुपस्थितीत असतात. ३० दिवसांपेक्षा जास्त अनुपस्थित असलेले शाळाबाह्य ठरतात. -श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी, जि. प. बीड.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.