आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबाजोगाई येथील आद्य कवी मुकुंदराज स्वामी भक्त निवासाच्या शंभर खोल्यांचे नव्या वर्षात नूतनीकरण करण्यात येणार आहे. संरक्षक भिंत, विठ्ठल रुख्माई मंदिर व परिसराचे सुशोभीकरण, विद्युतीकरण, पाण्याची सोय याचाही समावेश यात आहे. यासाठी दहा लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे.आवश्यक असलेला खर्च लोकसहभागातून करण्यात येणार आहे. मराठीचे आद्य कवी मुकुंदराज स्वामी यांची अंबाजोगाई शहरालगतच्या बाला घाटाच्या रांगा परिसरात समाधी आहे. आजूबाजूला मोठमोठाल्या पर्वत रांगा, दऱ्या असून अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे. या ठिकाणी आद्य कवी मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाच्या वतीने शंभर खोल्यांचे भक्तनिवास गेल्या १२५ वर्षांपासून अस्तित्वात आहे.
या ठिकाणी दररोज विविध धार्मिक कार्यक्रम होतात. पहाटे काकड आरती, विष्णु सहस्त्र नामपाठ, हरिपाठ, पंचपदी, भजन, वद्य एकादशी रोजी गीता पारायण, फराळाचे वाटप, वद्य एकादशी रोजी आद्य कवी मुकुंदराज स्वामींच्या समाधीकडे दिंडीचे प्रस्थान होते. स्वामीजींची आरती, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रम नियमित होतात. विशेष करून या ठिकाणी मुकुंदराज स्वामी यांच्या समाधी दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना त्याचप्रमाणे पर्यटकांसाठी मोफत भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे. भक्त निवासाच्या शंभर खोल्यांचे नूतनीकरण व सुशोभीकरण झाल्यानंतर अंबाजोगाई येथे देवदर्शनासाठी, पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या निवासाची गैरसोय दूर होणार आहे.आद्यकवी मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाच्या विश्वस्तांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या वर्षांमध्ये या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष किसन महाराज पवार यांनी दिली.
रस्त्याचे हवे डांबरीकरण
शहरापासून आद्य कवी मुकुंदराज समाधी स्थळ हे अंदाजे दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर आहे. या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांची यामुळे मोठी गैरसोय होत आहे. रस्त्याचे डांबरीकरण करणे अत्यावश्यक आहे. हे काम झाल्यास भक्तांची संख्या मोठया प्रमाणात वाढेल.
सव्वाशे वर्षांचे भक्त निवास
आद्यकवी मुकुंदराज स्वामी भजनी मंडळाच्या विश्वस्त मंडळाकडून १०० खोल्यांमध्ये भक्तनिवासाची सोय करण्यात आली आहे. या भक्त निवासाला सव्वाशे वर्षाची परंपरा आहे. नूतन वर्षात मंदिर व परिसराचा विकास करण्याचा संकल्प असून यासाठी दहा लाख रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. - किसन महाराज पवार, अध्यक्ष, ट्रस्ट
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.